आता अकोल्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन मॅट्रिक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 01:51 PM2020-01-01T13:51:26+5:302020-01-01T13:51:40+5:30
दोन महिने मिशन मॅट्रिक राबवून विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेण्यात येतील.
- नितीन गव्हाळे
अकोला: गतवर्षी इयत्ता दहावीचा घसरलेला निकाल, टक्केवारी पाहता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘मिशन मॅट्रिक’ संकल्पना हाती घेतली आहे. मिशन मॅट्रिक उपक्रमांतर्गत यंदा दहावीच्या निकालात वाढ करून विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. दोन महिने मिशन मॅट्रिक राबवून विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेण्यात येतील.
गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल केवळ ७0. ८२ टक्केच लागला होता. विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतसुद्धा घसरण झाली होती. गतवर्षीच्या निकालाची पुनरावृती मार्च-फेब्रुवारी २0२0 परीक्षेत जिल्ह्याचा निकाल उंचवावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मिशन मॅट्रिक संकल्पना मांडली. डाएट आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिशन मॅट्रिक उपक्रम माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. मिशन मॅट्रिक उपक्रमानुसार जिल्ह्यातील शाळांचा १00 टक्के निकालाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. गतवर्षी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा यंदा गुणवंत विद्यार्थ्यांची टक्केवारी पाच टक्क्यांनी आणि शाळांच्या निकालात १0 टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मिशन मॅट्रिक उपक्रमांतर्गत कमकुवत विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या उणिवा शोधून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, डाएटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे व त्यांची सात जणांची चमू मिशन मॅट्रिकवर काम करीत आहे.
विद्यार्थ्यांच्या तीन सराव परीक्षा
मिशन मॅट्रिक अंतर्गत माध्यमिक शाळांमधील इयत्ता दहावीत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या तीन सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत. या सराव परीक्षांमध्ये मिळणाºया गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे विश्लेषण करण्यात येणार आहे. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित विषयांसोबतच इतर विषयांवर विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी पालकांनासुद्धा विश्वासात घेण्यात येणार आहे.
शिक्षकांचे उद्बोधन वर्ग
दहावीचा निकाल वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने मिशन मॅट्रिक गंभीरतेने घेतले आहे. त्यासाठी इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांचे उद्बोधन वर्ग जिल्ह्यात घेण्यात येत आहेत. या शिक्षकांना निकाल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून डाएटच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मिशन मॅट्रिक ही जि.प. सीईओ आयुष प्रसाद यांची संकल्पना आहे. यंदा दहावीची टक्केवारी वाढविण्यासाठी हे मिशन राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या तीन सराव परीक्षा, कमकुवत विद्यार्थ्यांवर लक्ष देऊन योग्य मार्गाने शाळांचा १00 टक्के निकाल लावण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
-डॉ. समाधान डुकरे, प्राचार्य,
डाएट, अकोला.