गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली कारवाईची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 02:18 PM2018-10-14T14:18:07+5:302018-10-14T14:19:09+5:30
गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याने, यासंदर्भात कारवाई करण्याची शिफारस अकोट तहसीलदारांनी ३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे केली.
अकोला : गौण खनिजाच्या स्वामित्वधन रकमेचा (रॉयल्टी) पूर्ण भरणा करून, वाहतूक पासेस मिळविणाºया एका खदानधारकाने वाहतूक पासेसवर गौण खनिजाची विक्री न करता गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याने, यासंदर्भात कारवाई करण्याची शिफारस अकोट तहसीलदारांनी ३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे केली.
अकोट तालुक्यातील गाजीपूर येथील गट क्र .मधील १.२० हेक्टर आर भाडेपट्ट्याच्या क्षेत्रात खदान भाडेपट्टाधारक महेंद्र जयदीशप्रसाद तरडेजा यांनी गत २० नाव्हेंबर २०१० पासून गौण खनिजाचे उत्खनन सुरू केले. जिल्हाधिकाºयांच्या निर्देशाप्रमाणे वरिष्ठ उपसंचालक प्रादेशिक कार्यालय भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय नागपूर यांच्यामार्फत गत ५ सप्टेंबर २०१७ रोजी खदानधारक, गाजीपूरचे तलाठी, मंडळ अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाºयांच्या उपस्थितीत ‘ईटीएस’ मशीनद्वारे गौण खनिज उत्खननाची मोजणी करण्यात आली. या मोजणी अहवालाप्रमाणे खदानधारकाने ६९ हजार ९९७ ब्रास गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्वधन रकमेचा (रॉयल्टी) पूर्ण भरणा केला असून, प्रत्यक्षात गौण खनिजाचे उत्खनन ४६ हजार ७९० ब्रास करण्यात आले आहे. त्यामुळे खदानधारकाने उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे स्वामित्वधनाचा पूर्ण भरणा केला आहे; परंतु २३ हजार २०२ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन न करता, केवळ स्वामित्वधन रकमेचा (रॉयल्टी) भरणा करून, वाहतूक पासेस मिळविल्या आणि या वाहतूक पासेसवर गौण खनिजाची विक्री न करता गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे यासंदर्भात संबंधित खदानधारकाचा खुलासा घेऊन कारवाई करण्याची शिफारस अकोट तहसीलदारांनी ३ आॅक्टोबर रोजी पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे केली.
अकोट तहसीलदारांनी केलेल्या शिफारस पत्रानुसार, संबंधित खदानधारकास नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
-डॉ. अतुल दोड,
जिल्हा खनिकर्म अधिकारी.