सेरीब्रल पाल्सी आजाराबाबत समाजात गैरसमज - विनिता कदम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 07:27 PM2018-10-01T19:27:09+5:302018-10-01T19:27:40+5:30

सेरीब्रल पाल्सीचे रुग्ण पूर्णपणे चांगले होऊ शकतात. यासाठी रुग्णापेक्षा जास्त काळजी त्यांच्या पाल्यांनी घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. विनिता कदम यांनी व्यक्त केले.

 Misunderstanding in the society about cerebral palsy illness - vinita kadam | सेरीब्रल पाल्सी आजाराबाबत समाजात गैरसमज - विनिता कदम  

सेरीब्रल पाल्सी आजाराबाबत समाजात गैरसमज - विनिता कदम  

Next

- संजय खांडेकर
अकोला : सेरीब्रल पाल्सी  आजाराबाबत समाजातील सुशिक्षित आणि अज्ञानी दोघांमध्येही अनेक गैरसमज आहे. त्याबाबत जनजागृती आणि तातडीने उपचार झाले, तर सेरीब्रल पाल्सीचे रुग्ण पूर्णपणे चांगले होऊ शकतात. यासाठी रुग्णापेक्षा जास्त काळजी त्यांच्या पाल्यांनी घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. विनिता कदम यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब मिडटाऊनच्यावतीने २८ आणि २९ सप्टेंबर रोजी खंडेलवाल भवनात सेरीब्रल पाल्सीचे शिबिर झाले. विदर्भातील कानाकोपऱ्यातून या शिबिराला प्रतिसाद लाभला. १०८ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याने आयोजकांनाही समाधान लाभले आहे.


प्रश्न : सेरीब्रल पाल्सी हा रोग आनुवंशिक आहे का?
उत्तर : सेरीब्रल पाल्सी हा रोग आनुवंशिक नाही. मूल गर्भाशयात असताना त्याला झालेली शारीरिक आणि मानसिक इजा यातून सेरीब्रल पाल्सी रोग उद्भवतो. गर्भवती महिलेच्या मानसिक स्थितीवर हा रोग जास्त अवलंबून आहे. त्याला आनुवंशिक म्हणता येणार नाही; पण जर काही पिढीमध्ये अशी लक्षणे दिसून येत असतील, तर त्यांनी खबरदारी घ्यायला हवी.


प्रश्न : सेरीब्रल पाल्सी रोग होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे?
उत्तर : शक्यतोवर जवळच्या नातेवाइकांच्या लग्नसोयरीक करू नये. पुन्हा तेच जिन्स पिढीत आल्याने सेरीब्रल पाल्सी उद्भवू शकतो; मात्र तो आनुवंशिक मुळीच नाही. गर्भावस्थेदरम्यान महिलेची शारीरिक आणि मानसिक काळजी राखली गेली पाहिजे. सोनोग्राफी आणि इतर सर्व चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. एकाच कुटुंबातील एक सदस्य सुदृढ आणि दुसरा सेरीब्रल पाल्सीग्रस्त असल्याची अनेक उदाहरणे आहेत.


प्रश्न : सेरीब्रल पाल्सी रुग्णाचे प्रमुख लक्षणे काय?
उत्तर : जन्मताच जर मूल रडले नाही, त्याची हालचाल मंद असेल, तर त्या मुलाच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. मूल तीन महिन्यांनंतर शक्यतोवर मान धरते; पण तीन महिन्यांनंतरही मुलाची मान पडत असेल, तर त्या मुलास सेरीब्रल पाल्सी असण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला काही समजत नाही. नंतर अशा रुग्णांमध्ये एकापाठोपाठ एक नवीन लक्षणे असामान्य दिसून येतात, तेव्हा बालरोग तज्ज्ञाकडे दाखविले पाहिजे. जर आई-वडिलांच्या लक्षात ही बाब लवकर आली नाही, तर रोग बढावतो आणि तो आटोक्यात येत नाही.


प्रश्न : सेरीब्रल पाल्सीच्या रुग्णांवर काय उपचार पद्धती आहे?
उत्तर : सेरीब्रल पाल्सीचा रुग्ण म्हणजे ब्रेनला झालेली दुखापत. नर्व्हस सिस्टीमशी संबंधित फिजिओथेरपी केली जाते. रुग्णाचा आत्मविश्वास वाढविला जातो. ज्या पेशी कमजोर असतील, त्यांना शक्ती पुरविण्याचे विविध पातळीवर प्रयत्न केले जातात. आहारापासून विहारापर्यंत विविध प्रयोग केले जातात. सुरुवातीलाच जर ही बाब लक्षात आली, तर रुग्ण बरा होण्याची शक्यता जास्त असते.


प्रश्न : सेरीब्रल पाल्सीबाबत काय गैरसमज आहे?
उत्तर : ज्या कुटुंबीयात सेरीब्रल पाल्सीचा रुग्ण असेल, त्या कुटुंबीयात काही दोष असतील, असे समजणे चुकीचे आहे. मुळात गर्भाची वाढ होत असताना झालेल्या चुकांमुळे हा रोग होतो.

 

Web Title:  Misunderstanding in the society about cerebral palsy illness - vinita kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.