सीमकार्डचा गैरवापर; फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:30 PM2019-09-30T14:30:15+5:302019-09-30T14:30:21+5:30
सायबर पोलीस ठाणे येथून संबंधित माहिती घेतली असता बाळकृष्ण गोरले त्यांच्या घरी जाऊन शहानिशा केली.
अकोला : अकोट फैल परिसरातील अज्ञात आरोपीने हिरावंती बाळकृष्णा गोरले यांच्या नावे असलेले सीमकार्डचा दुरुपयोग केल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी कक्ष तसेच अकोट फैल पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दहशतवाद विरोधी कक्ष अकोला येथील कर्मचारी कर्तव्यावर असताना अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोपनीय माहिती काढत असताना त्यांच्या गोपनीय माहितीदारामाफर् त मिळालेल्या माहितीवरून म्हातोडी येथील बाळकृष्ण दशरथ गोरले यांचे नावे कोणीतरी अज्ञात इसमाने वोडाफोन कंपनीचा मोबाइल क्रमांकचे सीमकार्ड घेऊन अज्ञात व्यक्ती त्याचा गैरवापर करीत आहे. त्यानुषंगाने सायबर पोलीस ठाणे येथून संबंधित माहिती घेतली असता बाळकृष्ण गोरले त्यांच्या घरी जाऊन शहानिशा केली. गोरले हे मूकबधिर असल्याचे समजले. त्यावरून त्यांची व त्यांच्या पत्नी हिरावंती बाळकृष्ण गोरले यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, की नमूद मोबाइल क्रमांक हा आमचा नसून, आम्ही तो वापरत नाही. तसेच यापूर्वी तो क्रमांक कधीही वापरला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून अकोट फैल पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.