अंगणवाडीतील क्रीडा साहित्य, शौचालय निधीचा गैरवापर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:20 AM2021-05-25T04:20:57+5:302021-05-25T04:20:57+5:30
निहिदा : बार्शीटाकळी पंचायत समितींतर्गत असलेल्या वडगाव येथे सन २०१५-२०२० या कालावधीमध्ये अंगणवाडीतील लहान मुलांसाठी खेळण्यांची किट आणि ...
निहिदा : बार्शीटाकळी पंचायत समितींतर्गत असलेल्या वडगाव येथे सन २०१५-२०२० या कालावधीमध्ये अंगणवाडीतील लहान मुलांसाठी खेळण्यांची किट आणि शौचालयासाठी निधी आला होता. हा निधी नेमका कुठे खर्च केला, याची माहिती नसून, निधीचा संबंधितांनी गैरवापर केला असल्याची तक्रार सरपंच शाहिनाथ वामन बाबर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
वडगाव येथे मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. परंतु, अंगणवाडीतील लहान मुलांना खेळण्यासाठी किट आणल्या नाहीत. तसेच शौचालयासाठी कुठेही खोदकाम करण्यात आले नाही. त्यामुळे हा निधी कुठे खर्च केला? हे समजले नाही तसेच अंगणवाडीतील मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. सद्यस्थितीत पंजाब जाधव हे ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा निधी नेमका कुठे खर्च केला? याचा शोध घ्यावा. ज्या साहित्यासाठी, शौचालयासाठी निधी आला होता, तो कुठे खर्च करण्यात आला, याची चाैकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच शाहिनाथ बाबर यांनी तक्रारीतून केली आहे.