मुद्रांकांचा गैरवापर; उमेश राठीसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:22 PM2019-03-30T13:22:49+5:302019-03-30T13:22:54+5:30
अकोला: भूखंड व शेतीच्या प्रकरणांमध्ये अनेकांना गंडा घालणाऱ्या उमेश राठीने एका साथीदाराच्या मदतीने शासनाच्या १०० रुपयांच्या चार मुद्रांकांचा गैरवापर करीत त्या मुद्रांकांवर खाडाखोड करून उद्योजक विवेक पारसकर यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी राठीसह त्याच्या साथीदाराविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
अकोला: भूखंड व शेतीच्या प्रकरणांमध्ये अनेकांना गंडा घालणाऱ्या उमेश राठीने एका साथीदाराच्या मदतीने शासनाच्या १०० रुपयांच्या चार मुद्रांकांचा गैरवापर करीत त्या मुद्रांकांवर खाडाखोड करून उद्योजक विवेक पारसकर यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी राठीसह त्याच्या साथीदाराविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
रणपिसे नगरातील उमेश कन्हैयालाल राठी याने स्टॅम्पपेपर विक्रेता शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख याच्यासोबत संगनमत करीत २ जुलै २०१५ रोजी नोंद क्रमांक ४८५१ क्रमांकाचा मुद्रांक विवेक पारसकर यांच्यातर्फे धर्मेंद्र दोड यांना विक्री केल्याचे कटकारस्थान रचले. याच मुद्रांकांच्या आधारे त्यावर खाडाखोड करीत बनावट करारनामा, बनावट इसारपावती करीत उमेश राठीचा नातेवाईक भुसावळ येथील मनोज बियाणी याच्यासोबतच पारसकर यांनी भुसावळमधीलच प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे दाखवून इसारापोटी ९० लाख रुपये पारसकर यांना दिल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर पारसकर यांनी खरेदी करण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार पारसकर यांच्याविरुद्धच भुसावळ पोलीस ठाण्यात करून पारसकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता; मात्र प्रत्यक्षात पारसकर यांनी मुद्रांक खरेदी केलेला नसल्याचे भुसावळ पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर मुद्रांक ज्या शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख याच्याकडून खरेदी केला, त्याची चौकशी केली असता त्याने पारसकर यांना ओळखत नसल्याचे सांगितले तसेच उमेश राठीच्या सांगण्यावरूनच हा प्रताप केल्याचे सांगितले. त्यामुळे विवेक पारसकर यांनी त्यांच्याविरुद्ध रचण्यात आलेल्या षड्यंत्रासह ९० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली असता विवेक पारसकर यांच्या नावाचा गैरवापर करीत चार मुद्रांक विकत घेण्यात आले व त्यावर खाडाखोड करीत उमेश राठी व शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख या दोघांनी विवेक पारसकर यांनाच फसवणुकीच्या प्रकरणात अडकविले तसेच त्यांच्याक डून ९० लाख रुपये खंडणी मागितल्याचेही उघड झाले; मात्र हे षड्यंत्र रचताना मुद्रांक नोंदणीच्या रजिस्टरवर पारसकर यांचे नाव आहे तर इसारपावतीसाठी वापरलेल्या मुद्रांकावर दुसऱ्याच व्यक्तीने नाव असल्याने तसेच दोन्ही अक्षरात व मजकुरात प्रचंड तफावत असल्यामुळे हे षड्यंत्र पोलीस चौकशीत समोर आले. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी उमेश राठी व शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३८४, १२० ब आणि मुंबई मुद्रांक अधिनियमच्या कलम ६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.