मनपाच्या शिबिराला प्रतिसादच नाही!
By admin | Published: March 15, 2015 01:29 AM2015-03-15T01:29:54+5:302015-03-15T01:29:54+5:30
अकोलेकरांची पाठ; मनपा दंडात्मक कारवाईच्या पवित्र्यात.
अकोला: शहरातील नागरिकांना मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशातून मनपाने आयोजित केलेल्या शिबिराकडे अकोलेकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. नागरिकांची भूमिका लक्षात घेता, प्रशासन थकीत मालमत्ता करावर दंड आकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
शहरातील मालमत्ताधारक कर जमा करीत नसल्याने मूलभूत सुविधांची पूर्तता करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. थकबाकीचे प्रमाण मोठे असल्याने कर वसूल करण्यासाठी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी धडक मोहीम हाती घेतली. मागील दीड महिन्यांपासून शहरातील दुकाने, हॉटेल, प्रतिष्ठाने, राहत्या घरांना सील लावण्याची कारवाई सुरू आहे. नाइलाजाने अशा अप्रिय कारवाया टाळण्यासाठी उपायुक्त मडावी यांनी १४ ते १५ मार्च या दोन दिवसाच्या कालावधीत अकोलेकरांना कर जमा करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. नागरिकांच्या सुविधेसाठी पूर्व-पश्चिम,उत्तर-दक्षिण झोननिहाय मुख्य चौकांमध्ये कॅम्प आयोजित करण्यात आले. २शिबिराच्या माध्यमातून अकोलेकरांना कर जमा करण्याचे आवाहन मनपाने केले असता, नागरिकांनी शिबिराकडे चक्क पाठ फिरवल्याचा प्रकार दिसून आला. ही बाब लक्षात घेता, माधुरी मडावी यांनी यापुढे थकबाकी असणार्या मालमत्ताधारकांना दंड आकारण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.