मनसे नेते अमित ठाकरे अकोल्यात, मालोकार कुटूंबियांची घेतली भेट; कुटूंबियांना अश्रू अनावर
By नितिन गव्हाळे | Published: August 1, 2024 08:27 PM2024-08-01T20:27:15+5:302024-08-01T20:27:24+5:30
कुटूंबियांच्याशी पाठीशी असल्याचे ठाकरेंनी केले स्पष्ट
अकोला: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरील मंगळवारी झालेल्या हल्ला प्रकरणात सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे गुरूवार १ ऑगस्ट रोजी अकोल्यात आले होते. त्यांनी निंबी (मालोकार) येथे जाऊन जय मालोकार यांच्या कुटूंबियांची भेट घेत, त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.
अमित ठाकरे यांनी, जय मालोकार यांच्या निधनाचे दु:ख असून, त्यांच्या कुटूंबियांच्या कायम पाठिशी आमचा पक्ष आहे. आपण कोणतही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. यावेळी अजित पवार गट व मनसे मध्ये झालेला राडा व अन्य राजकीय गोष्टींवर काहीही भाष्य करणे अमित ठाकरे यांनी टाळले. याप्रसंगी अमित ठाकरे यांनी मालोकार कुटुंबीयांना आर्थिक मदतही दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते विठ्ठल लोखंडकार, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, शहराध्यक्ष सौरभ भगत उपस्थित होते.
जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी अमित ठाकरे यांनी कुटुंबियांना दिले. तसेच राज ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याचंही अमित ठाकरे यांनी मालोकार कुटुंबीयांना सांगितले. यावेळी जय मालोकार यांचे आई वडील, मोठे भाऊ विजय मालोकार उपस्थित होते.