मो. इर्शाद हत्याकांडातील सहा आरोपी निर्दोष
By admin | Published: April 7, 2017 10:58 PM2017-04-07T22:58:16+5:302017-04-07T22:58:16+5:30
अकोला : १२ जुलै २०१२ रोजी घडलेल्या मो. इर्शाद मो. अयुब हत्याकांडातील सहा आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली.
जिल्हा न्यायालयाने ठोठावली होती जन्मठेप, उच्च न्यायालयात सुटका
अकोला : हाशम सेठ लायब्ररीजवळ १२ जुलै २०१२ रोजी घडलेल्या मो. इर्शाद मो. अयुब हत्याकांडातील सहा आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. या हत्याकांडात सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती; मात्र उच्च न्यायालयाने या आरोपींची सुटका केली.
कागजीपुरा येथील रहिवासी मो. इर्शाद मो. अयुब यांच्यावर मो. मुनाफ मो. हबीब, मो. अन्सार, मो. इरफान, मो. आमीर, मो. आजम आणि मो. हनीफ या सहा जणांनी अवैध सावकारीच्या कारणावरून १२ जुलै २०१२ रोजी रात्री ८ वाजता धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मो. इर्शाद मो. अयुब यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या डोक्यावर मोठा दगड टाकून त्यांचा खून करण्यात आला होता. मो. इर्शाद याच्यासोबतच त्याचा भाऊ मो. एजाज याच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मो. एजाज यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी सदर सहा जणांसह १२ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३०७, ३०२ आणि आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने यामधील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती; मात्र आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या निर्णयाविरोधात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने या सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अविनाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना अॅड. आर. के. तिवारी, अॅड. आकाश गुप्ता आणि अॅड. आशिष देशमुख यांनी कामकाज पाहिले.
विधिज्ञांना धमकी
मो. मुनाफ मो. इर्शाद हत्याकांडातील आरोपींचे वकील अॅड. अविनाश गुप्ता यांनी सदर प्रकरण न्यायालयात चालवू नये म्हणून त्यांना धमकी देण्यात आली होती; मात्र या धमक्यांना बळी न पडता गुप्ता यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर सदर आरोपी निर्दोष सुटले आहेत.