मनपाने केबल खंडित करताच मोबाइल सेवा ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:35 PM2020-01-22T12:35:42+5:302020-01-22T12:35:55+5:30
मंगळवारी सकाळी ९ वाजता मनपाच्या विद्युत विभागाने दोन्ही केबल खंडित करताच एका मोबाइल कंपनीची सेवा पूर्णपणे ठप्प पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिका प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या देशातील नामवंत मोबाइल कंपन्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच प्रकरण निस्तरण्यासाठी धावपळ, लगबग सुरू झाली आहे. दोन मोठ्या कंपन्यांनी विद्युत खांब, पथखांबावरून टाकलेल्या नियमबाह्य ‘ओव्हरहेड केबल’च्या रंगात साम्य असल्यामुळे मंगळवारी सकाळी ९ वाजता मनपाच्या विद्युत विभागाने दोन्ही केबल खंडित करताच एका मोबाइल कंपनीची सेवा पूर्णपणे ठप्प पडली. कनेटिव्हिटी जोडण्यासाठी संबंधित कंपनीची चांगलीच धावाधाव झाली. सायंकाळी ४ नंतर काही प्रमाणात मोबाइल सेवा सुरू झाल्याने वैतागलेल्या अकोलेकरांना दिलासा मिळाला.
शहरातील प्रमुख रस्ते, प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांची तोडफोड करून महापालिकेला ठेंगा दाखवत अनेक नामवंत कंपन्यांनी अनधिकृतपणे भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मनपा प्रशासनाकडे सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये शुल्काचा भरणा न करणाºया कंपन्यांनी नेमके कोणाचे खिसे गरम केले, यावर संपूर्ण शहरात खमंग चर्चा सुरू झाली आहे.
हा प्रकार चव्हाट्यावर येताच मनपा आयुक्त संजय कापडणीस ‘अॅक्शन मोड’वर असल्याचे दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठ्या एका नामवंत कंपनीचे अनधिकृत केबल शोधण्याचे आदेश दिल्यानंतर बांधकाम विभागाच्यावतीने झोननिहाय खोदकाम करून तपासणी करण्यात आली असता, यादरम्यान २६ किलो मीटरपेक्षा अधिक अनधिकृत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे आढळल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मोबाइल कंपन्यांना मनपा प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्यामुळे की काय, शहरातील पथखांब, विद्युत खांब तसेच इमारतींवरूनदेखील अनधिकृत ‘ओव्हरहेड केबल’ टाकल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार विद्युत विभागाने ‘त्याच’ कंपनीचे ‘ओव्हरहेड केबल’ खंडित करण्याला सुरुवात केली आहे.
रंगात साम्य; कर्मचारी गोंधळात
मंगळवारी सकाळी ९ वाजता विद्युत विभागाने शहरातील प्रमुख पाच मार्गांवर टाकलेले ‘ओव्हरहेड केबल’ खंडित करण्याला सुरुवात केली. यावेळी सिंधी कॅम्प,आदर्श कॉलनी, निमवाडी परिसरात दोन केबलचा रंग एकसारखा दिसत असल्याने गोंधळलेल्या कर्मचाºयाने दोन्ही केबल खंडित करताच दुसºयाच कंपनीची सेवा ठप्प पडली.
या मार्गावर केली कारवाई
मनपाच्या विद्युत विभागाने मंगळवारी सकाळी अशोक वाटिका ते सर्वोपचार रुग्णालय रस्ता, दक्षता नगर चौक ते निमवाडी परिसर, सिंधी कॅम्प ते खदान, आदर्श कॉलनी, मोठी उमरी ते गुडधी आदी मार्गावरील ‘ओव्हरहेड केबल’ खंडित केले.
...तर मनपाची जबाबदारी नाही!
एका मोबाइल कंपनीने मनपाच्या विनापरवानगी टाकलेले ‘ओव्हरहेड केबल’ काढण्यासाठी मुदत मागितली. त्याला प्रशासनाने संमती दिली असली तरी संबंधित कंपनीच्या केबलचा रंग लाल आणि देशातील सर्वात मोठ्या कंपनीच्या केबलचा रंग केशरी असून, उन्हामुळे दोन्ही केबलचा रंग पुसट झाला आहे. कारवाईदरम्यान संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने उपस्थित राहण्याची ‘आयडिया’ मनपाने लढवली होती. मंगळवारी हा प्रतिनिधी निर्धारित वेळेवर न पोहोचल्यामुळे मोबाइल सेवा ठप्प पडल्याची माहिती आहे.