दहशतवादी हल्ल्याचे ‘मॉक ड्रील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:13 AM2020-08-28T11:13:36+5:302020-08-28T11:13:48+5:30

पोलिसांकडून काही क्षणातच हे मॉक ड्रील असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकतात.

Mock drill of terror attack | दहशतवादी हल्ल्याचे ‘मॉक ड्रील’

दहशतवादी हल्ल्याचे ‘मॉक ड्रील’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यासमोरील आकाशवाणी केंद्रात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची वाहने मोठ्या वेगात येतात आणि आकाशवाणी केंद्रावर सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार करतात. हे पोलिसांचे मॉक ड्रील असले तरी एकाचवेळी पोलिसांची अनेक वाहने शहरात दाखल झाल्याने मोठी घटना घडल्याची चर्चा अन् अफवा होते; मात्र पोलिसांकडून काही क्षणातच हे मॉक ड्रील असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकतात.
आकाशवाणी केंद्रामध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आकाशवाणी केंद्राला घेराव घालतात आणि पोलिसांचे पथक कार्यालयातील सहा अतिरेक्यांना ठार करते. गणेशोत्सव आणि मोहोरमच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने गुरुवारी दुपारच्या सुमारास सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनसमोरील आकाशवाणी केंद्रात दहशतवाद्यांचा खात्मा कशा प्रकारे केल्या जातो, यासंदर्भात मॉक ड्रील केले. आकाशवाणी केंद्रात दहशतवादी घुसले असून, त्यांनी संपूर्ण आकाशवाणी केंद्र हॉयजॅक केल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, अ‍ॅम्बुलन्स, शिघ्रकृतीदल, बॉम्बशोधक व नाशक पथकास ही माहिती देण्यात आली. काही वेळात पोलीस अधीक्षक जी श्रीधर, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व पोलीस स्टेशनचे अधिकारी व इतर यंत्रणा त्वरित आकाशवाणी केंद्रासमोर दाखल झाली.
दहशतवादी असलेल्या आकाशवाणीचा परिसर पोलिसांनी दोरी लावून निर्मनुष्य केला. संपूर्ण घटना पाहताना परिसरातील समस्त नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला, त्यातच पोलिसांनी एक एक करून चार दहशतवाद्यांना ठार केले. हा सर्व प्रकार सुरू असताना नागरिकांना काहीच कळेनासे झाले; मात्र पोलिसांनी मॉक ड्रिल पूर्ण झाल्यानंतर मॉकड्रिल असल्याचे जाहीर केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तब्बल अर्धातास हे मॉक ड्रिल सुरू होते.
अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात हे मॉक ड्रील करण्यात आले असून, जिल्ह्यात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला उत्तर देण्यासाठी पोलीस तयार असल्याचे या माध्यमातून दाखविण्यात आले.

Web Title: Mock drill of terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.