मोदी सरकार असेपर्यंत सरदार पटेल यांच्या मूर्तीपेक्षा उंच मूर्ती होणार नाही - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 02:16 PM2018-11-18T14:16:27+5:302018-11-18T14:17:13+5:30
अकोला: सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकच सर्वात उंच असले पाहिजे, यासाठी मुंबईच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येत असून, जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार आहे, तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीपेक्षा दुसरी उंच मूर्ती होणार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर अयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करीत, मुख्यमंत्री रोजच नव्या घोषणा करतात, ते त्यांच्या आणि लोकांच्याही लक्षात राहत नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकारच्या धोरणाविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात यापूर्वी संघर्ष यात्रा काढली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
...तर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव मागण्याची वेळ आली नसती!
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती मुख्यमंत्र्यांना प्रेम असते, तर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्याची वेळ आली नसती, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जागा वाटपावर चर्चा सुरू!
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सध्या राज्यातील जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणूकही आघाडी मिळून लढविणार आहे, आघाडीतील मित्र पक्षांसाठी काही जागा सोडण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.