अकोला शहरातील मोहम्मद अली मार्गाने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:00 PM2018-07-20T13:00:35+5:302018-07-20T13:04:34+5:30
मनपाच्या अतिक्रमण विभागाने मोहम्मद अली मार्गावर धडक कारवाई केल्यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र समोर आले.
अकोला : शहरातील रहदारीने व रहिवासी वस्त्यांनी अत्यंत गजबजलेल्या मोहम्मद अली मार्गावरील अतिक्रमणामुळे अकोलेकरांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागत होते. ताजनापेठ पोलीस चौकी व मोठ्या मस्जीदच्या परिसराला अतिक्रमकांनी विळखा घातल्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले होते. गुरुवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने मोहम्मद अली मार्गावर धडक कारवाई केल्यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र समोर आले.
शहरातील मुख्य रस्त्यांवर लघू व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून, नागरिकांना पायी चालणे मुश्कील झाले आहे. शहरात अतिक्रमण फोफावत असताना मनपाचा अतिक्रमण विभाग या समस्येकडे अर्थपूर्ण उद्देशातून दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी अतिक्रमण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवा बंद करण्याचा सज्जड दम दिला होता. महापौरांच्या इशाºयानंतर झोपेतून जागे झालेल्या अतिक्रमण विभागाकडून शहरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात आहे. गुरुवारी अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांच्या मार्गदर्शनाखाली जैन मंदिर ते ताजनापेठ पोलीस चौकी, मोहम्मद अली मार्गावर थाटलेल्या अतिक्रमणाचा सफाया केला. अतिक्रमकांनी चक्क रस्त्यावरच दुकाने थाटल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. मनपाच्या कारवाईनंतर स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.