घराच्या मागील बाजूने येऊन मुलीचा विनयभंग; आराेपी युवकास तीन वर्षांची सक्तमजुरी
By नितिन गव्हाळे | Published: April 30, 2023 01:39 PM2023-04-30T13:39:20+5:302023-04-30T13:39:29+5:30
मुलीच्या तक्रारीनुसार बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास तत्कालीन पीएसआय गणेश काळे यांनी केला.
अकोला : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना, गावातील एक युवक घराच्या मागील कंपाउंडवरून उडी मारून घरात आला आणि मुलीला जवळ ओढून त्याने विनयभंग केला. याप्रकरणात अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील शर्मा यांच्या न्यायालयाने शनिवारी आरोपी विठ्ठल रामेश्वर मंडासे (वय १९) याला तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावला.
मुलीच्या तक्रारीनुसार ३ ऑक्टोबर २०२२ राेजी दुपारी ती घरी एकटी अभ्यास करीत असताना, आरोपी विठ्ठल मंडासे (१९) हा घराच्या मागील बाजूचे कंपाउंडवरून उडी मारून घरात आला आणि त्याने अचानक मुलीला जवळ ओढत, मी तुला पसंत करतो, असे म्हणत विनयभंग केला. मुलीने कशीतरी त्याच्या तावडीतून सुटका केली आणि घराशेजारच्या फोनवरून आतेभावाला घटना सांगितली. त्यानंतरही आरोपीने पुन्हा घरी येऊन ही गोष्ट कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली.
मुलीच्या तक्रारीनुसार बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास तत्कालीन पीएसआय गणेश काळे यांनी केला. सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदाराच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. साक्ष, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील दीपक वामनराव गोटे यांनी बाजू मांडली. त्यांना पोलिस कर्मचारी प्रिया गजानन शेगोकार यांनी सहकार्य केले.