पैसा झाला खोटा; वैध असतानाही दहा रुपयांचे नाणे चालेना!
By Atul.jaiswal | Published: September 21, 2021 12:00 PM2021-09-21T12:00:48+5:302021-09-21T12:03:24+5:30
Ten rupee coin did not work even though it was valid : दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास किरकोळ व्यावसायिकांसह मोठे व्यापारीही कचरत असल्याचे वास्तव आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : दहा रुपयांची नाणी पूर्णपणे वैध असून, ती भारतीय चलनाचाच एक भाग असल्याचा निर्वाळा भारतीय रिझर्व्ह बँकेने वारंवार देऊनही, अकोला शहरासह जिल्ह्यात ग्राहकांकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास किरकोळ व्यावसायिकांसह मोठे व्यापारीही कचरत असल्याचे वास्तव आहे. बाजारात चालतच नसल्याने अनेकांकडे दहा रुपयांच्या नाण्यांचा मोठा संग्रह झाला आहे. ही नाणी स्वीकारावीत, अशा रिझर्व्ह बँक व सरकारच्या सूचना आहेत. मात्र, व्यावसायिक चक्क नकार देत असल्याने काय करावे, असा प्रश्न आता सामान्यांसमोर उभा ठाकला आहे.
रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये १० रुपयांची नाणी चलनात आणली. सध्या १४ प्रकारची नाणी चलनात असून त्यापैकी कुठल्याच नाण्यावर अद्याप बंदी लादण्यात आलेली नाही, असे ‘आरबीआय’ने यापूर्वी अनेकवेळा स्पष्ट करून नागरिकांच्या मोबाईलवर यासंदर्भात जनजागृतीपर संदेशही पाठविले. असे असताना जिल्ह्यातील व्यापारपेठांमधील बहुतांश व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
कुठल्याच नाण्यांवर बंदी नाही
१० रुपयांची १४ प्रकारची नाणी चलनात वैध असल्याचे ‘आरबीआय’ने २०१८ मध्ये जाहीर केले होते. ही सर्व नाणी वेगवेगळ्या स्वरूपातील आहेत. यामाध्यमातून आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे विविध पैलू प्रदर्शित होतात. सर्व बँकांनी व बाजारपेठेतील व्यावसायिकांनी १० रुपयांची नाणी स्वीकारावीत, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले होते; मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही.
बँकांमध्ये नाण्यांचा मोठा साठा
जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास सपशेल नकार दिला जात आहे. बँकांमध्ये मात्र दहा रुपयांची नाणी स्वीकारली जातात. त्यामुळे बँकांमध्येही दहा रुपयांच्या नाण्यांचा मोठा साठा आहे. मोठ्या प्रमाणात नाणी जमा करावयाची असल्यास ती कुठून आली याचे कारणही बँकेत सादर करावे लागते.
कोणती नाणी नाकारली जातात
सध्या चलनात असलेल्या विविध नाण्यांपैकी १, २ व ५ रुपयांची नाणी बिनदिक्कतपणे स्वीकारली जातात. दहा रुपयांची नाणी मात्र कोणीही घेत नाहीत. एखादेवेळी दहा रुपयांची जुनी नाणी स्वीकारतील, परंतु पितळ व स्टेनलेस स्टील अशी दुहेरी आवरण असलेली नाणी स्वीकारण्यास व्यावसायिक स्पष्ट नकार देतात.
पैसा असूनही अडचण
माझ्याकडे दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात आहेत. भारतीय चलन असल्याने मी ही नाणी स्वीकारली, परंतु आता कोणताही दुकानदार या नाण्यांमध्ये व्यवहारच करत नाही. त्यामुळे पैसा असूनही अडचण निर्माण झाली आहे.
- गजानन डांगे, अकोला
दहा रुपयांची नाणी नाकारणे हा चलनाचा अवमान आहे. बाजारात ही नाणी कोणीच स्वीकारत नाही. अनेकदा बँकांमध्येही ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला जातो. सामान्य नागरिकांना आरबीआयच्या दिशानिर्देशांबाबत माहिती नसते.
- राजेश टेकाडे, अकोला
बँक अधिकारी काय म्हणतात
दहाची नाणी पूर्णपणे वैध असून, ती स्वीकारलीच पाहिजे. सर्वच बँका ही नाणी स्वीकारतात. एखादी बँक स्वीकारत नसेल, तर रिझर्व्ह बँकेचे तक्रार निवारण सेलकडे तक्रार केली जाऊ शकते. तथापि, मोठ्या प्रमाणात नाणी जमा करावयाची असल्यास तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाणी कशी आली, याचे समर्पक कारण बँकेला द्यावे लागेल, असे एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याचे अटीवर सांगितले.