पैशाचा वाद; युवकाला मारहाण करून शेतात फेकले
By आशीष गावंडे | Published: April 4, 2024 09:15 PM2024-04-04T21:15:42+5:302024-04-04T21:16:00+5:30
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; शिवापूर येथील घटना
अकोला: पैशाच्या कारणावरून एका ३२ वर्षीय युवकाला मारहाण करीत त्याला शिवापूर भागातील शेतात फेकून दिले. या मारहाणाीत युवक गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी खदान पाेलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद दयाराम ढोरे, ऋषिकेश प्रल्हाद ढोरे व अविनाश साहेबराव पातोंडे असे आरोपींची नावे आहेत. तर मंगेश वामन दामोधर असे जखमी युवकाचे नाव आहे.
जखमी अवस्थेत मंगेश दामाेधर याने रुग्णालयातून पोलिसांना बयान दिले. त्यात म्हटले की, 'त्याच्या आईने सन २०१३ मध्ये म्हाडा कॉलनी खडकी येथील प्लॉटचा गोविंदराव सिरसाट यांच्यासाेबत व्यवहार केला हाेता. या व्यवहारात प्रल्हाद ढोरे यांचा समावेश होता. मंगेश हा ढोरेच्या घरातील व शेतातील कामे करायचा. ८ मार्च रोजी दुपारी मंगेश हा प्रल्हाद ढाेरेच्या घरी गेला व प्लॉटच्या व्यवहारातील पैशांपैकी दोन हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा ढाेरे याने तुमचा व्यवहार हा माझ्यासोबत नसून गोविंदराव सिरसाट यांच्यासोबत आहे. तुमचे तुम्ही पाहून घ्या, असे म्हटले, त्यानंतर प्रल्हाद ढोरेचा मुलगा ऋषिकेश याने पुन्हा आमच्याकडे दिसला तर हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याचे बयाणात नमुद आहे.
मारहाण केली अन् फेकून दिले
ढाेरे यांच्या घरी वाद झाल्यानंतर मंगेश घरी आला असता लगेच प्रल्हाद दयाराम ढोरे, ऋषिकेश प्रल्हाद ढोरे व अविनाश साहेबराव पातोंडे यांनी मंगेशला मारहाण केली. वाहनात काेंबून शेत शिवारात घेऊन गेल्यानंतर मारहाण केली व फेकून दिल्याचे तक्रारीत नमुद आहे. या मारहाणीत मंगेशचे हातापायांचे हाड मोडले असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. खदान पोलिसांनी नागपुर येथे जावून रुग्णालयात मंगेशचे बयाण नोंदवल्यानंतर उपराेक्त तीनही आराेपींविराेधात भादंविचे कलम व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणी खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्यासाेबत भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.