बँक खात्यातून पैसे काढणारे रॅकेट सक्रिय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:56 AM2017-08-03T01:56:34+5:302017-08-03T01:58:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती रोशनपुरा येथील प्रतिष्ठित नागरिक फिश र्मचंट समीउल्लाखान यांना त्यांच्या मोबाइलवर फोन करून बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएम कार्ड व पासवर्ड मागून त्यांच्या खात्यामधील ४0 हजार रुपये लंपास करण्यात आले. ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली. विशेष म्हणजे मंगळवारी अकोला येथील एका व्यापार्याला असाच खोटा कॉल करुन ७0 हजार रुपयाची रक्कम त्याच्या बँक खात्यातून काढल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे अशा प्रकारे खोटे कॉल करुन रक्कम हडपणारे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसत आहे.
फिश र्मचंट समीउल्लाखान यांना अज्ञात भामट्याने निवावी मोबाइल कॉल करून आपण बँक अधिकारी असल्याचे सांगून त्यांचे एटीएम कार्ड काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द केल्या जात आहे. नवीन एटीएम कार्ड मिळण्यासाठी त्यांचा एटीएम क्रमांक व पासवर्ड मागितला. समीउल्लाखान यांनी १६ अंकी कोड व चार अंकी पासवर्ड देताच मोबाइलवर दुसर्या बाजूने असलेल्या व्यक्तीने त्यांचे भारतीय स्टेट बँक शाखा मूर्तिजापूरच्या खात्यातून एका सेकंदात ४0 हजार रुपये काढले. त्यांना त्यांच्या मोबाइलवर खात्यामधून ४0 हजार रुपये काढल्याचा मॅसेज आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार गजानन पडघन यांची भेट घेऊन घटनाक्रम कथन केला. ही घटना मंगळवारी घडली. त्यांनी त्याच दिवशी तक्रार दाखल केली. ठाणेदार पडघन यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन घटनेचा तपास त्वरित अकोल्याच्या सायबर सेलकडे वर्ग केला आहे. पुढील तपास सायबर सेल करीत आहे.
बँक खात्यातून परस्पर ४0 हजार रुपये काढण्याची फिर्याद समीउल्लाखान यांनी दिल्यावरून सदर प्रकरण त्वरित तपासाकरिता सायबर सेलकडे रवाना केले आहे. २४ तासांच्या आत तक्रार सायबर सेलकडे पाठविल्यास पैसे परत मिळण्याची शाश्वती अधिक असते.
- गजानन पडघन
ठाणेदार, शहर पोलीस स्टेशन, मूर्तिजापूर.