जलालाबादच्या उत्खनन स्थळी चेक पाॅइंटद्वारे महसूल विभागाची निगराणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:13 AM2021-02-05T06:13:05+5:302021-02-05T06:13:05+5:30
सायखेड : जलालाबाद येथील परिसरातील शासकीय जमिनीवर होत असलेल्या उत्खननाद्वारे मुरुम काढण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ३ फेब्रुवारी रोजी ...
सायखेड : जलालाबाद येथील परिसरातील शासकीय जमिनीवर होत असलेल्या उत्खननाद्वारे मुरुम काढण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ३ फेब्रुवारी रोजी प्रकाशित करताच महसूल विभागाने येथील चेक पाॅइंटवरील तैनात असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचा तपासणीचा पहारा कडक करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येथील उत्खननाच्या परवानगी प्रक्रियेनंतर ५ जानेवारीपासून अकोला - मेडशी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता पहिल्या टप्प्यात १७ हजार ब्रास मुरुमाची परवानगी देण्यात आली. गाैण खनिज उत्खनन करणारी कंपनी मे. माॅन्टेकारलो लि. ही असून मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गजानन हामंद हे या उत्खननाबाबत दैनंदिन आढावा घेत आहेत. याकरिता कोणत्या वाहनातून किती ब्रास गाैण खनिज वाहतूक दररोज होते याची पाहणी करण्यासाठी चेक पाॅइंट उभारण्यात आले असून, तेथे तलाठी कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. येथील गाैण खनिज उत्खननाचे काम नियमानुसार सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत करायचे असते, परंतु महामार्गाचे काम जलदगतीने व्हावे या उद्देशाने रात्रीच्या वेळीसुद्धा हे काम सुरू आहे. जलसंधारणाच्या दृष्टीने उत्खनन स्थळी तलावाची निर्मिती करण्यात येणार असून अंदाजे एक लाख ब्रास गाैण खनिज टप्प्याटप्प्याने रीतसर परवानगी प्रक्रियेनंतर काढण्यात येणार असल्याचे समजते.