कृषी विद्यापीठ परिसरातील हल्लेखोरे माकड जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:01 AM2020-01-21T11:01:02+5:302020-01-21T11:01:08+5:30
पादचाऱ्यांवर हल्ले करणारे दोन माकड सोमवारी अकोला व अमरावती येथील बचाव पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद केले.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दुचाकीचालक तसेच पादचाऱ्यांवर हल्ले करणारे दोन माकड सोमवारी अकोला व अमरावती येथील बचाव पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद केले. या दोन्ही माकडांना ट्रँग्युलाइज करून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, सध्या ही माकडे वन विभागाच्या ताब्यात आहेत.
कृषी विद्यापीठात सकाळी तसेच सायंकाळी फिरण्यासाठी येत असलेल्या नागरिकांवर तसेच येणाºया, जाणाºया दुचाकीचालकांवर या परिसरातील दोन माकडांनी हल्ला केला होता. या प्रकरणाची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाच्या अमरावती व अकोला येथील बचाव पथकासह मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सोमवारी एक मोहीम राबवून सदर दोन्ही माकडे जेरबंद केली. या माकडांना ताब्यात घेण्यासाठी उपवनसंरक्षक विजय माने, सहायक वनसंरक्षक सुरेश वडोदे, नितीन गोंडाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजसिंह ओवे, वनपाल गीते यांच्यासह बचाव पथकाचे ई. वाय. चौधरी, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, प्रवीण सरप, अनिल चौधरी, बंडू गावंडे, यशपाल इंगोले यांनी माकडांचा पाठलाग करून घेरले. त्यानंतर अमरावती येथील बचाव पथकाचे अमोल गावने यांनी ट्रँग्युलाइज करून माकडांना बेशुद्ध केले. दोन्ही बचाव पथकाने परिश्रम घेऊन ही मोहीम पार पाडली. बाळ काळणे हे कर्करोगाने ग्रस्त व दिव्यांग असताना वन्यजीव सेवा कार्य करीत आहेत.