राज्यात सर्वत्र मान्सून पोहोचला !
By admin | Published: June 25, 2015 11:55 PM2015-06-25T23:55:25+5:302015-06-25T23:55:25+5:30
पश्चिम व-हाडातील शेतक-यांना दमदार पावसाची प्रतीक्षा.
अकोला : यंदा मान्सून सर्वत्र पोहोचला; पण पश्चिम विदर्भात तीन जिल्हय़ात अपेक्षित पाऊसच नाही. सलग पाच वर्षापासून या भागात ही परिस्थिती असून, चांगल्या पावसाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. विदर्भात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन होत असते. नागपूर मध्यभागी असल्यामुळे अरबी व बंगाल या दोन्ही उपसागराकडून येणार्या मान्सूनचा फायदा विदर्भाला होत असतो. म्हणजेच या दोन्ही उपसागराकडून येणारा मान्सून विदर्भात बरसतो. असे असले तरी बंगालच्या उपसागराकडून येणार्या मान्सूनचा जोर हा अधिक असतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणूनच अरबी समुद्राकडून येणार्या पावसाच्या दुप्पट पाऊस बंगालच्या उपसागराकडे तयार झालेल्या मान्सून प्रणालीकडून विदर्भाला मिळतो; परंतु यावर्षी या दोन्हीकडून येणारी मान्सून प्रणाली अशक्त असल्याने पश्चिम विदर्भातील अकोला व बुलडाणा जिल्हय़ात पावसाचे चित्र सध्या तरी अस्पष्ट आहे. यावर्षीच्या पावसावर एल-नीनोचा प्रभाव राहील, असे हवामनशास्त्र विभागाकडून सांगितले जात होते. तथापि, यंदा वेळेवर पाऊस सुरू झाला आहे; पण राज्यातील १२ जिल्हय़ात 0 ते २५ टक्केच पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून कोकणाचा भाग वगळता पावसाने उघडीप दिली आहे. वर्हाडात मात्र चार दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून, उकाड्यात वाढ होताना दिसत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागानेदेखील तीन ते चार दिवस मान्सूनच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचे स्पष्ट केले आहे; पण येत्या दोन-तीन दिवसात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.