डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचा श्रीगणेशा डिसेंबरमध्ये!
By admin | Published: October 16, 2015 02:12 AM2015-10-16T02:12:34+5:302015-10-16T02:12:34+5:30
निविदा प्रक्रिया सुरू ; १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
अकोला : बहुप्रतीक्षित डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात या कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या या कामासाठी खासदार संजय धोत्रे यांनी पाठपुरावा करीत २५ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. परंतु उड्डाण पुलाचे डिझाइन तसेच इतर अडचणींमुळे अनेक दिवसांपासून काम रखडले होते. या मार्गावरील वाहनांची गर्दी बघता खा. धोत्रे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे यांना उड्डाण पुलाच्या उपयुक्ततेबाबत माहिती देऊन येणार्या अडचणी सोडविण्याची विनंती केली होती. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनीही शेगाव, तेल्हारा, जळगाव जामोद, खामगाव, मुक्ताईनगर या भागातील वाहतूकदारांसाठी या मार्गावर उड्डाण पूल होणे आवश्यक असल्याचे वेळोवेळी अधोरेखित केले होते. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामातील सर्व अडचणी दूर करून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत कंत्राटदारांकडून उड्डाण पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा बोलविल्या आहेत. या कामासाठी अंदाजे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे उड्डाण पुलामुळे रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.