अकोला रेल्वेस्थानकावर उभारणार ‘मॉन्युमेंटल फ्लॅग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 04:01 PM2019-10-11T16:01:35+5:302019-10-11T16:01:39+5:30
अकोला रेल्वेस्थानकावर ३०.५ मीटर उंचावर हा तिरंगा राहणार आहे.
अकोला: अकोला रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी या परिसरात गगनचुंबी मॉन्युमेंटल फ्लॅग लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या फ्लॅगची जागा आणि विद्युत्त रोषणाईबाबत बैठकाही पार पडल्यात. बुधवारी खोदकामाने या कार्याची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे काही दिवसांतच रेल्वेस्थानक परिसरात मोठा तिरंगा फडकताना अकोलेकरांना दिसणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासन भुसावळ मंडळाने दिलेल्या माहितीनुसार अकोला रेल्वेस्थानकावर ३०.५ मीटर उंचावर हा तिरंगा राहणार आहे. या तिरंग्याचा आकार २० बाय ३० राहणार चौरस आकारात राहणार आहे. मध्य रेल्वेच्या अकोला, नाशिक, अमरावती, धुळे सह मध्यप्रदेशच्या खंडवा स्थानकावर मॉन्युमेंटल फ्लॅग लागणार आहे. मुंबईच्या एका कंपनीकडे या सर्व स्थानकावरील कामाचा कंत्राट देण्यात आला आहे. काम सुरू झाल्यापासून तीन महिन्यात फ्लॅग उभारणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाचे आहे. अकोला रेल्वे स्थानकाच्या सौदर्यींकरणात मॉन्युमेंटल फ्लॅगमुळे भर पडणार आहे.