मूग, उडीद, सोयाबीन ‘एफएक्यू’च्या निकषात नापास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:58 AM2017-10-30T00:58:31+5:302017-10-30T01:00:42+5:30
अकोला : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्रात या धान्याचा दर्जा ‘एफएक्यू’ (सरासरी गुणवत्ता) नसल्याच्या कारणाने शेकडो नमुने रिजेक्ट केले जात आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील चार केंद्रांवर गेल्या पाच दिवसांत मूग ८८ क्विंटल तर उडिदाची केवळ ३0३ क्विंटल खरेदी झाली आहे.
सदानंद सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्रात या धान्याचा दर्जा ‘एफएक्यू’ (सरासरी गुणवत्ता) नसल्याच्या कारणाने शेकडो नमुने रिजेक्ट केले जात आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील चार केंद्रांवर गेल्या पाच दिवसांत मूग ८८ क्विंटल तर उडिदाची केवळ ३0३ क्विंटल खरेदी झाली आहे. धान्याच्या दर्जावरून येत्या काळात केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने खरेदीचा हट्ट न करता शेतकर्यांना पीक पेर्यावर अनुदान देण्याची मागणी पुढे ये त आहे.
मूग, उडिदासोबतच सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्हय़ात चार केंद्र सुरू झाली. त्यासाठी शेतकर्यांना आधी नोंदणी करावी लागत आहे. त्यानंतर उत्पादित धान्याचा नमुना केंद्रात आणून त्याचा ‘एफएक्यू’ दर्जा तपासला जात आहे. त्यामध्ये मूग, उडिदाला पांढरे डाग असल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळे हा परिणाम झाला आहे, तर सोयाबीनमध्ये आद्र्रतेचे प्रमाण १२ तब्बल २१ टक्के असल्याने खरेदी न करण्याचा पवित्रा केंद्रातील संबंधितांनी घेतला आहे. त्यामुळे या तीनही धान्याचे नमुने खरेदी केंद्राच्या तपासणीत ‘रिजेक्ट’ केले जात आहेत. सोयाबीनची वाळवण करून आद्र्रतेचे प्रमाण कमी करता येते. मूग, उडिदासाठी ही सोय नाही. या पिकांची विक्री कशी करावी, या मुद्यावर आता शेतकरी बिथरले आहेत. जिल्हय़ात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे. त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी हमीभावाने होत नाही. व्यापारी खरेदी करीत नाहीत, त्यामुळे त्या धान्याचे करायचे काय, असा संतप्त सवालही पुढे येत आहे.
उशिरा सुरू होऊनही अत्यल्प खरेदी
जिल्हय़ात १३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी २४ ऑक्टोबर रोजी झाली. जिल्हय़ातील चारही केंद्रांत तेव्हापासून आतापर्यंत मूग केवळ ८८ तर उडिदाची खरेदी ३0३ क्विंटल झाली आहे. केंद्रात दररोज ५0 शेतकर्यांना बोलावले जाते, हे विशेष. आकड्यांचा हा खेळ पाहता खरेदीसाठी येणारे नमुने मोठय़ा प्रमाणात रिजेक्ट होत असल्याचे स्पष्ट होते.
खरेदी केंद्रात येणारे नमुने ‘एफएक्यू’च्या निकषानुसार तपासले जातात. त्या निकषाच्या अधीन राहूनच केंद्रात खरेदी करता येते. शेतकर्यांचा त्रास वाचावा, यासाठी आधी नमुना तपासून नंतरच केंद्रात आणावयास सांगितले जाते.
- बजरंग ढाकरे,
जिल्हा मार्के टिंग अधिकारी, अकोला.