मनपाच्या हद्दवाढीवर एप्रिल महिन्यात शिक्कामोर्तब!
By admin | Published: March 5, 2016 02:45 AM2016-03-05T02:45:51+5:302016-03-05T02:45:51+5:30
मनपा आयुक्तांची सचिवांसोबत चर्चा.
अकोला: महापालिकेच्या हद्दवाढीवर एप्रिल महिन्यात शिक्कामोर्तब होईल. हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी १ मार्च रोजी स्वाक्षरी केल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शुक्रवारी नगर विकास विभागाच्या सचिवांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. येत्या पंधरा दिवसात शासनाकडून प्राथमिक अधिसूचना जारी होईल.
महापालिक ा क्षेत्राची हद्दवाढ करण्याच्या दिशेने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. २00१ मध्ये मनपा अस्तित्वात आल्यानंतर मनपा हद्दवाढीचा पहिला प्रशासकीय प्रस्ताव २00२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला होता. यामध्ये मनपा क्षेत्रालगतच्या सुमारे २१ गावांचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने अकोलेकरांना रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधा दिल्या जात असल्या तरी या सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत असल्याची परिस्थिती आहे. हद्दवाढ झाल्यास मालमत्तांच्या संख्येत वाढ होऊन त्यापासून मनपाला महसूल प्राप्त होऊ शकतो. यादरम्यान, शहरासह २१ गावांमधील लोकसंख्येची माहिती सादर करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने मनपाला दिले होते. त्यानुषंगाने शहरालगतच्या गावांचे नकाशे, शहराला जोडल्या जाणार्या सीमारेषा, गावांतील लोक संख्या, त्यांचे दरडोई उत्पन्न आदी इत्थंभूत बाबींचा अहवाल प्रशासनाने तयार करून जिल्हाधिकार्यांमार्फत अमरावती विभागीय कार्यालय आणि तेथून नगर रचना संचालनालय (पुणे)कडे पाठवला. पुणे कार्यालयाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आयुक्त अजय लहाने यांनी फेब्रुवारी महिन्यात हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर केला. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी १ मार्च रोजी प्रस्तावाला मंजुरी दिली. येत्या पंधरा दिवसात हद्दवाढीसंदर्भात हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी शासनाकडून प्राथमिक अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. या विषयावर शासनाची भूमिका लक्षात घेता, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंंत हद्दवाढीला मंजुरी मिळणार असल्याची माहिती आहे.