मोर्णेच्या पुराचा अतिक्रमकांना धोका!
By admin | Published: July 8, 2016 02:12 AM2016-07-08T02:12:39+5:302016-07-08T02:12:39+5:30
नदीपात्रात बांधली घरे; अकोला महापालिकेच्या पत्राला अतिक्रमकांचा ठेंगा.
अकोला: मोर्णा नदीच्या काठावर आणि चक्क नदी पात्रात अतिक्रमकांनी पक्की घरे उभारली आहेत. अशा घरांना पावसाळ्य़ात पुराचा धोका लक्षात घेता अतिक्रमकांनी तातडीने घरे रिकामी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने दिला होता. प्रशासनाच्या पत्राला ठेंगा दाखवत एकाही अतिक्रमकाने घर सोडले नसल्याचे चित्र समोर आले आहे.
कधीकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणार्या मोर्णा नदीची अकोलेकरांनीच दुरवस्था केली आहे. सद्यस्थितीत शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोर्णा नदीचा वापर सुरू आहे. संपूर्ण शहरातील घाण, सांडपाणी मोर्णा नदीच्या पात्रात सोडल्या जाते. यामुळे नदीच्या काठावर प्रचंड घाण साचली असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही अतिक्रमकांनी नदीच्या काठावर तर अनेकांनी चक्क नदी पात्रात मातीचे भराव घालून पक्की घरे उभारली आहेत. ही बाब कमी म्हणून की काय, नदी पात्रात वीटभट्टय़ादेखील उभारण्यात आल्या. या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून प्रदूषणाला हातभार लागत असल्याचे चित्र आहे. नदी पात्रात माती व मुरुमाचे भराव घालून पक्की घरे उभारण्याचा सपाटा अतिक्रमकांनी लावल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्य़ात पुराचा धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी नदीच्या काठावरील आणि नदी पात्रातील अतिक्रमकांना तातडीने घरे रिकामी करण्याचे फ र्मान जारी केले होते. प्रशासनाच्या सूचना वजा आदेशाला अतिक्रमकांनी ठेंगा दाखवला असून नदी पात्रातील अतिक्रमण कायम असल्याचे चित्र आहे.