कोविडच्या २०० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 11:33 AM2020-12-27T11:33:19+5:302020-12-27T11:35:44+5:30
Akola News कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीमध्ये समावून घेण्याची मागणी आरोग्य संघटनांमधून केली जात आहे.
अकोला : कोरोना काळात स्वत:च्या जिवाची बाजी लावून रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी अधिपरिचारीकांना पूर्वसूचना न देताच नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. कोविड काळातील रुग्णसेवेचा विचार करता जिल्ह्यातील २००पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीमध्ये समावून घेण्याची मागणी आरोग्य संघटनांमधून केली जात आहे. कोरोना काळात रुग्णसेवेसाठी तत्काळ कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली होती. सहा महिन्यांपर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळत नाही, तोपर्यंत या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले होते. सप्टेंबर महिन्यानंतर कोविड रुग्णांमध्ये कलामीची घट झाल्याने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे जवळपास २००पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले. अचानक सेवेतून कमी करण्यात आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात असून, त्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी आरोग्य संघटनांकडून केली जात आहे.
कंत्राटी स्टाफ कामावर नसल्याने बेरोजगारी
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. अशातच अधिपरिचारीकांना रुग्णसेवेसोबतच रोजगाराचीही संधी मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. परंतु, रुग्णसंख्या कमी होताच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यात आले. अचानक रोजगार गेल्याने जिल्ह्यातील २००पेक्षा जास्त जणांवर बेरोजगारी ओढवल्याची माहिती समोर आली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- गुणवत्ता यादीनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती, मग सेवेतून काढतानादेखील त्याच आधारे निर्णय घेणे आवश्यक.
- कुठलीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करणे योग्य नाही. प्रशासनाने रुग्णसेवेतून कमी करताना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.
- कोविड काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला जेवण, पिण्याचे पाणी दिले गेले. परंतु, नंतर त्यांच्या या सुविधा बंद करण्यात आल्याने बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले. या सुविधा कायम ठेवण्यात याव्या.
- सेवेतून काढण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे. तसेच त्यांना नियमित वेतन द्यावे.
कोरोना काळात रुग्णसेवा दिली, परंतु, प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी केले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे.
- स्वाती गजानन शेलवट, कंत्राटी कर्मचारी
अचानक सेवेतून कमी करण्यात आल्याने अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. प्रशासनाने याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत सामावून घ्यावे.
- रचना वाहूरवाघ, कंत्राटी कर्मचारी