राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीन बियाणे नापास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:37+5:302021-07-15T04:14:37+5:30
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणांचे नियोजन केले होते; परंतु गतवर्षी सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका ...
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणांचे नियोजन केले होते; परंतु गतवर्षी सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात पीक खराब झाले. बहुतांश सोयाबीनची उगवणक्षमता नसल्याने राज्यात ५० टक्केपेक्षा अधिक सोयाबीन बियाणे नापास झाले. यावर्षी बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होेते.
राज्यात खरीप हंगामासाठी जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता भासते. या बियाणांच्या पुरवठ्यामध्ये अर्धा वाटा हा महाबीजचा असतो. महाबीजमार्फत राज्यभरात बियाणांचे वितरण केले जाते. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान, राज्यात सोयाबीन उत्पादनात घट आली. बियाणांसाठी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर याचा परिणाम झाला. या शेतकऱ्यांकडून बीज परीक्षण प्रयोगशाळेला सात लाख ३२ हजार ८९१ क्विंटल सोयाबीन बियाणे प्राप्त झाले; परंतु प्रक्रिया झाल्यानंतर चार लाख ४२ हजार ४३३ क्विंटल सोयाबीन बियाणे नापास झाले. यातील काही बियाणे काडी-कचरा साफ करून दाना लहान असल्याने प्रक्रियेआधीच काढून टाकण्यात आले होते.
प्रक्रियेसाठी प्राप्त बियाणे
७,३२,८९१ क्विंटल
प्रक्रिया झालेले बियाणे
५,८५,१३१ क्विंटल
चांगले बियाणे
४,८१,१८९ क्विंटल
प्रमाणीकरण झालेले बियाणे
२,९०,४५८
८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी
गतवर्षी सोयाबीन बियाणाची राज्यातील ८४ हजार ९४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी नोंदणी करण्यात आली होती; परंतु यातील ८० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेण्यात आले.
महाबीजची नियोजित उद्दिष्टपूर्ती नाही!
यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे चार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे वितरणाचे उद्दिष्ट होते; परंतु मोठ्या प्रमाणात बियाणे नापास झाले. त्यामुळे राज्यात जवळपास दोन लाख क्विंटल बियाणांचे वितरण केले असून, नियोजित उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही.
इतर पिकांचे ५३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणित
राज्यातील परीक्षण प्रयोगशाळेत सोयाबीन सोबत उडीद, मूग, तूर, धान व इतर पिकांचे प्रमाणीकरण केले जाते. यामध्ये सोयाबीनवगळता इतर पिकांचे ५३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणित झाले.