सायबर गुन्ह्यांच्या दोनशेपेक्षा अधिक तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 04:59 PM2020-07-22T16:59:44+5:302020-07-22T16:59:53+5:30
जानेवारी ते ३० जून या कालावधीत अकोला सायबर सेलकडे २६८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मोबाइल, लॅपटॉप तसेच संगणकाच्या युगात सायबर गुन्हेगारीही प्रचंड वाढली असून, आॅनलाइन फसवणूक, बदनामी, तसेच महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी जानेवारी ते ३० जून या कालावधीत अकोला सायबर सेलकडे २६८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यामधील बहुतांश तक्रारदारांचे समाधान झाल्याने केवळ १४ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापैकी ८ गुन्हे उघडकीस आणत सहा आरोपींना जेरबंद करण्यात अकोला सायबर सेलला यश आले आहे.
अकोला सायबर सेलकडे आलेल्या तक्रारींमध्ये अधिक तक्रारी या ओटीपीची मागणी करून बँक खात्यातून पैसे काढणे, आॅनलाइन आमिष देऊन फसवणूक करणे, एटीएम क्लोन करून परस्पर पैसे काढणे, फेसबुक तसेच मेसेंजरच्या माध्यमातून अडचणीत असल्याचे सांगत तसेच मित्राच्याच खात्यावरून पैशाची मागणी केल्याचे गुन्हे अकोला सायबर सेलने दाखल केले आहेत. यासोबतच आॅनलाइन माध्यमातून वाहन खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे तक्रारीवरून समोर आले आहे.
तर गिफ्ट लागल्याचे आमिष देऊन आणि लोन देण्याच्या आमिषाखालीही अनेकांना लाखो रुपयांनी गंडविल्याचे वास्तव आहे. या भुरट्या चोरांनी आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक रुपयांनी आॅनलाइन गंडा घातल्याचे वास्तव असून, यामधील केवळ ४ लाख रुपयांची रक्कम गोठवून ती परत करण्यासाठी पूर्ण प्रक्रियेची कामगिरी सायबर सेलने केली आहे.
कोरोनामुळे तपास रखडले
नेट बँकिंग तसेच आॅनलाइन गिफ्ट आणि एटीएमएच्या नावाखाली ओटीपी मागून पैसे गायब करणाऱ्या हॅकरचा शोध लावण्यात सायबर सेलला यश आले आहे; मात्र हे हॅकर्स नोएडा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगाल राज्यातील असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे कोरोनामुळे शक्य नसल्याने या कालावधील काही प्रकरणांचे तपास रखडल्याची माहिती आहे. सायबर सेलसोबतच स्थानिक गुन्हे शाखेने आयटी अॅक्ट तसेच सायबर गुन्ह्यांतील आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
फेसबुक-व्हॉट्स अॅपवर युवतींचा छळ
फेसबुक तसेच व्हॉट्स अॅप हे सोशल मीडियाची माध्यमे महिला तसेच युवतींसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मेसेंजरवर मेसेज करणे, त्यानंतर विविध आमिषे देऊन त्यांचा मोबाइल क्रमांक घेणे आणि युवतींचा छळ करण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यासाठी सायबर सेलकडून वारंवार आवाहन करून आॅनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत; मात्र तरीही बहुतांश युवती व महिला आमिषाला बळी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.