आस्थेचं दैवत सिंदखेडचा मोरेश्वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:26+5:302021-08-23T04:22:26+5:30
येथील शिवलिंगामधील पाणी कधीच आटत नाही. गावावर किंवा देशावर मोठे संकट येणार असल्यास ते पाणी आटत असल्याचेही गावकरी सांगतात. ...
येथील शिवलिंगामधील पाणी कधीच आटत नाही. गावावर किंवा देशावर मोठे संकट येणार असल्यास ते पाणी आटत असल्याचेही गावकरी सांगतात.
मुघल काळात मंदिर तोडण्याच्या उद्देशाने औरंगजेबाने सिंदखेड मोरेश्वर येथे स्वारी केली होती. दरम्यान, त्याने मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गावकऱ्यांनी त्यांच्या श्रद्धेचं स्थान असल्याचे सांगत मंदिर तोडण्याला विरोध केला हाेता. औरंगजेबाने मंदिरातील दगडाच्या नंदीसमोर चारा ठेवला अन् नंदीने चारा खाल्ल्यास मंदिर पाडणार नाही, अशी अट घातली. काही क्षणातच दगडाच्या नंदीने चाऱ्याची पेंढी खाल्ल्याचा चमत्कार झाल्याची आख्यायिका गावकऱ्यांनी सांगितली. या घटनेनंतर मंदिराला कोणी धक्काही लावू नये, अशी ताकीद औरंगजेबाने त्याच्या सैन्याला दिली. भविष्यात पुन्हा त्याच्या सैन्याने मंदिर पाडू नये म्हणून मंदिराच्या बाहेर सांकेतिक कोरीव दगड रोवला. या घटनेनंतर भाविकांची श्रद्धा आणखी वाढू लागली, ती आजतागायत कायम आहे. हा सांकेतिक कोरीव दगड आजही मंदिराबाहेर या घटनेची साक्ष देत आहे.
सिंदखेड मोरेश्वर येथील मोरेश्वर मंदिर हे पौराणिक आहे. औरंगजेबाने स्वारी करून मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी मंदिरातील दगडाच्या नंदीने चारा खाऊन चमत्कार केला होता. त्यानंतर औरंगजेबाने मंदिर न पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्याची साक्ष आजही मंदिरासमोर कोरीव दगडाच्या रूपात दिसून येते. मंदिरात अनेकदा साक्षात्कार झाले आहेत. मोरेश्वराचे हे मंदिर श्रद्धा अन् आस्थेचं केंद्र आहे.
- वसंतराव राजाराम नवलकार, ग्रामस्थ, सिंदखेड मोरेश्वर