‘मोर्णा’ स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:49 PM2018-04-16T13:49:44+5:302018-04-16T13:49:44+5:30
अकोला: अकोल्याच्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद घेण्यात आली.
अकोला: अकोल्याच्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद घेण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १४ व्या टप्प्यातील या मोहिमेत तब्बल चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र रविवारी या उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, की स्वच्छ पाणी आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छ करण्याचे आमचे मिशन होते. यास अकोलेकरांनी भरभरून साथ दिला. हे मिशन थांबणार नाही, तापत्या उन्हामुळे मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी नदीकाठी विकास कामे सुरूच राहणार आहेत. गरज भासल्यास आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा नदी स्वच्छतेसाठी जनतेला निश्चितपणे आवाहन करण्यात येईल. यावर्षीच्या १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत आजपर्यंत सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन नदीचे सात किलोमीटर पात्र स्वच्छ केले. यामध्ये तब्बल १३८ सामाजिक संस्थांनी मोहिमेत सहभाग घेतला.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या मोहिमेचे कौतुक करून मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले. हे नदी स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नदीच्या विकासासाठी यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी सुमारे २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला, तर अकोट तलाठी संघटनेने रुपये ५१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. दरम्यान, मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा दिल्ली येथे सत्कार व्हावा, याकरिता अकोलेकरांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र देण्याबाबतचे आवाहन यावेळी दिल्लीचे आयएएस अधिकारी जगदीश पाण्डेय यांना केले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरीश पिंपळे मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, योगेश पाटील, डॉ. मनीष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.