मोर्णा स्वच्छतेसाठी प्रशासन सज्ज; लोकप्रतिनिधींनी केले आवाहन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:59 AM2018-01-12T01:59:40+5:302018-01-12T02:00:21+5:30
अकोला : सध्या प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या शनिवारपासून होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संघटना सज्ज झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सध्या प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या शनिवारपासून होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संघटना सज्ज झाल्या आहेत. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मोर्णा नदीचा वापर केला जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. नदी पात्रात वाढलेली जलकुंभी, डासांची पैदास व दुर्गंधीमुळे नदीकाठच्या रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसहभागातून मोर्णा नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे.
सौंदर्यीकरणासाठी केंद्र सरकार सकारात्मक - खा. धोत्रे
1 - साबरमतीच्या धर्तीवर सौंदर्यीकरणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र सरकार व राज्य सरकार सकारात्मक असून, लवकरच या बाबत मार्णेच्या संदर्भातील परियोजनेला मंजुरी मिळेल, असा आशावाद खा. संजय धोत्रे यांनी व्यक्त केला. १३ जानेवारी २0१८ रोजी सकाळी ८.00 वा शहर कोतवालीजवळील गणेश घाटावर उपस्थित राहून नागरिकांनी मोर्णा स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन खा. संजय धोत्रे यांनी केले आहे.
2 - पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी नद्यांची स्वच्छता व पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत मोर्णा नदीची स्वच्छता व पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी साबरमती नदी प्रकल्पाची पाहणी करून त्या धर्तीवर मोर्णेचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार नदी विकास व गंगा शुद्धीकरण खात्याच्या केंद्रीय मंत्री उमा भारती तसेच केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना प्रथम टप्प्यात दोन कोटी रुपये उपलब्ध करणे तसेच प्रस्तावास मंजुरी व निधी देण्यासाठी मागणी करून वेळोवेळी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी केले आवाहन
या मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह जिल्हा पत्रकार संघ तसेच विविध संघटना व सामाजिक संस्थांनी केले आहे.
१४ पथकांचे केले गठन
१३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या साफसफाईला सिटी कोतवाली चौक ते हिंगणा फाटा परिसरापर्यंत सुरुवात केली जाईल. एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊन कामकाजात व्यत्यय येणार नाही, यासाठी १४ पथकांचे गठन करण्यात आहे असून, प्रत्येक पथकाला नदीच्या काठावर जागा निश्चित करून दिल्या आहेत. या मोहिमेचे प्रमुख उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे असून, प्रत्येक पथकात मनपाचे झोन अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या देखरेखीखाली सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश राहील.
असे राहील अभियान
शनिवारी सकाळी आठ वाजता नियोजित ठिकाणी एकत्र यावे. सकाळी ८ ते १२ दरम्यान o्रमदानातून स्वच्छता अभियान नदीकाठी तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात काठावर जाण्यासाठी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. नदीपात्रात उतरून जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी ६0 कामगारांची मदत घेण्यात आली आहे. काठावर टाकण्यात आलेली जलकुंभी नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर व घंटागाडीमध्ये भरण्यात येईल. मोहिमेत सहभागी होणार्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी गमबूट, हातमोजे, चेहर्याला मास्क आदी साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.