मोर्णेच्या पात्रात पुन्हा जलकुंभी; डासांची पैदास वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 03:32 PM2019-04-05T15:32:33+5:302019-04-05T15:33:10+5:30
मोर्णेच्या पात्रात पुन्हा एकदा जलकुंभी बहरल्याचे चित्र आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढली असून, नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
अकोला: मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. नदी पात्रातील जलकुंभी काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला असून, त्याचे परिणाम समोर आले आहेत. मोर्णा नदीची थातूरमातूर पद्धतीने स्वच्छता केल्यामुळे मोर्णेच्या पात्रात पुन्हा एकदा जलकुंभी बहरल्याचे चित्र आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढली असून, नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपा प्रशासनाने २० लाखांची तरतूद केली असली, तरी प्रशासनाला कधी मुहूर्त सापडतो, असा प्रश्न अकोलेकर उपस्थित करीत आहेत.
कधीकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मोर्णा नदीची महापालिकेच्या अनास्थेमुळे पुरती वाट लागली आहे. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी उपाययोजना न करता मनपा प्रशासनाने चक्क मोर्णा नदी पात्राचा वापर केल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात बोटावर मोजता येणारे पूर वगळता मोर्णा नदीच्या पात्रात वर्षभर घाण सांडपाणी तुंबल्याचे दिसून येते. त्यावर निर्माण होणारी जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी ८ ते १० लाख रुपये खर्च केले जातात. गतवर्षी जिल्हा प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर मोर्णा नदी स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी हिरिरीने सहभाग नोंदविला. या कामासाठी नदी पात्रात मनपाच्या मोटर वाहन विभागाची अख्खी यंत्रणा जुंपण्यात आल्याचे चित्र होते. मोर्णा स्वच्छता अभियानला एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्यापही नदी पात्रातील घाण सांडपाण्याची समस्या कायमच असल्याची परिस्थिती आहे. आज रोजी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी बहरली असून, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
महापौर-आयुक्त साहेब, समस्या निकाली काढा!
नदी पात्रातील जलकुंभीमुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, याकडे सत्ताधारी भाजप व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे महापौर व आयुक्त साहेब ही समस्या तातडीने निकाली काढा, असा सूर उमटत आहे.