मोर्णेच्या पुराने पिके पाण्याखाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:12+5:302021-07-23T04:13:12+5:30
पुरामुळे खरडून गेलेल्या शेतीची बांधावर जाऊन माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी गुरुवारी पाहणी केली. दमदार पावसाने हातरुण परिसरातील मोर्णा ...
पुरामुळे खरडून गेलेल्या शेतीची बांधावर जाऊन माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी गुरुवारी पाहणी केली.
दमदार पावसाने हातरुण परिसरातील मोर्णा नदीला गुरुवारी मोठा पूर आला. यामुळे नदी आणि नाल्याच्या पुराने शेतात असलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. शेती खरडून गेली असून शेतात मोठमोठे खड्डे पडले आहेत. हातरुण, दुधाळा, शिंगोली, मालवाडा, मंडाळा, लोणाग्रा, हातला, मांजरी, अंदुरा भाग एक आणि दोन परिसरात पूर व पावसामुळे शेतजमिनीवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. हातरुण येथे पुराचे पाणी आठवडी बाजारापर्यंत आले होते. आठवडी बाजाराजवळ असलेले सोपीनाथ महाराज मंदिरात पुराचे पाणी शिरले. पुरामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.
शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
हातरुण येथील ६५० हेक्टर, मांजरी येथील २५० हेक्टर, शिंगोली येथील ६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे पूर व पावसाने नुकसान झाल्याचा अंदाज असून असा अहवाल कृषी विभागाला पाठवणार असल्याची माहिती कृषी सहायक गावित यांनी बोलताना दिली. पिकांची हानी झाल्याने आता तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता पेरणीसाठी पैसा कोठून आणावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
फाेटो:
स्प्रिंकलर पाइप गेले वाहून, बोअरवेलचेही नुकसान
पुराच्या पाण्याने हातरुण ते कंचनपूर रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. लोणाग्रा ते आगर मार्गावरील चोंढीच्या नाल्यावरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मांजरी गावाजवळील पूल वाहून गेला असून हातरुण परिसरातील रस्त्यांची पाऊस व पुरामुळे दुर्दशा झाली आहे. हातरुण ते दुधाळा मार्गावरील विजेचा खांब वाकला आहे. यावेळी मंडळ अधिकारी देशमुख, तलाठी भटकर, कृषी सहायक गावित, सरपंच वाजीद खान, पोलीस पाटील संतोष बोर्डे, मंजूरशाह, गजानन नसुर्डे, शिवशंकर निर्मळ, नंदकिशोर ठाकरे, साबीर अहेमद, अतुल हेलगे, शिंगोली सरपंच महेश बोर्डे, साबीर खान, संजय घंगाळे, ऋषिकेश गावंडे, पंकज सोनोने, संतोष गव्हाळे, यांच्यासह शेतकरी यावेळी हजर होते.
मोर्णा आणि पूर्णा नदी, तसेच नाल्यांच्या पुराने शेती पिकांची मोठी हानी झाली आहे. शेती खरडून गेल्याने तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी व महसूल विभागाने पाहणी करावी आणि शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी.
- नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर.
मोर्णा नदी व नाल्यांच्या पुरामुळे हातरुण येथील ६५० हेक्टर, मांजरी येथील २५० हेक्टर, शिंगोली येथील ६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीचा अहवाल कृषी विभागाला पाठविणार आहे.
-सुजित गावित, कृषी सहायक, हातरुण.