सकाळी खंडणीची मागणी, रात्री सशस्त्र हैदोस
By admin | Published: July 2, 2014 12:21 AM2014-07-02T00:21:08+5:302014-07-02T00:31:58+5:30
सातव चौकामध्ये चिखलपुर्यातील ८ ते १0 गुंडांच्या टोळीने हैदोस घालून परिसरात दहशत निर्माण करून भिसे सायकल शॉपमध्ये तोडफोड केली.
अकोला: सातव चौकामध्ये चिखलपुर्यातील ८ ते १0 गुंडांच्या टोळीने हैदोस घालून परिसरात दहशत निर्माण करून भिसे सायकल शॉपमध्ये तोडफोड केली. सायकल शॉपमधील एका जणाच्या अंगावर तलवारीने वार करून त्याला जखमी केले. सकाळी गुन्हा दाखल झाल्याने गुंडांनी मंगळवारी रात्री ८.३0 वा. धुमाकूळ घातला.
राजेश मनोहर भिसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सातव चौकात भिसे सायकल शॉप आहे. मंगळवारी सकाळी त्यांचे भाऊ उमेश भिसे यांचा चिखलपुर्यातील गुंड दीपक पहूरकर याने दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात दीपकने उमेशला मारहाण केली. त्यानंतर उमेशने रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मंगळवारी रात्री ८.३0 वाजता सुमारास दीपक पहूरकर हा ८ ते १0 युवकांना घेऊन सातव चौकात आला. त्याने राजेश भिसे यांच्या दुकानात घुसून त्यांच्या दुकानातील सायकली व इतर साहित्य फेकून दिले आणि भिसे यांच्यावर तलवारीने वार केले. राजेश यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गुंडांनी घातलेल्या हैदोसामुळे नागरिक व व्यावसायिक घाबरून गेले होते. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवा ठाकूर व ताफा घटनास्थळी पोहाचला. हल्या केल्याप्रकरणी पोलिसांनी रात्री पहूरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
** दीड लाखांच्या खंडणीची मागणी
सातव चौकामध्ये हॉटेलचे बांधकाम करणार्या युवकास दीड लाख रुपयांची खंडणी मागून त्यास मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उमेश विनोद भिसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातव चौकामध्ये त्यांचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू ठेवायचे असेल तर दीड लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी चिखलपुर्यातील गुंड दीपक पहूरकर केली होती. भिसे यांच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनीपहूरकर विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.
** गुंडांच्या टोळ्या सक्रिय
शहरामध्ये दररोज नवीन गुंड उदयास येत आहे. या गुंडांच्या टोळीने शहरातील नागरिक, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. खंडणी मागण्याचे प्रकार या टोळय़ाकडून सातत्याने घडत आहेत; मात्र पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे या गुंडांचे मनोबल वाढले आहे. जठारपेठ परिसरात रिपाइं युवक आघाडीचा शहराध्यक्ष गोपाल कदम, अनिकेत अबगड या गुंडांची दहशत आहे. आता पाच महिन्यांपूर्वी मुंबईवरून आलेल्या दीपक पहूरकर या गुंडाने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. बिल्डर, व्यावसायिक खंडणी वसूल करण्याचा गोरखधंदाच या टोळीने सुरू केला.