जीएसटी सॉफ्टवेअर अपडेटचा घोळ दुसऱ्या दिवशीही कायम
By admin | Published: July 3, 2017 02:09 AM2017-07-03T02:09:29+5:302017-07-03T02:09:29+5:30
ग्राहकांना सर्रास दिले जात आहे जुनेच बिल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुलैपासून देशभरात (वस्तू व सेवा कर) जीएसटी कायदा लागू झाला असला, तरी अजूनही बाजारपेठेत जीएसटीच्या कायद्यान्वये ग्राहकांना बिल दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. सॉफ्टवेअर अपटेडचा घोळ अजून कायम असून, याला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्राहकाला जीएसटीमध्ये नेमके बदल तरी काय झाले, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
जुलैच्या १ तारखेपासून जीएसटी कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे. यासाठी ३० जूनपर्यंत जीएसटी नोंदणीचे आवाहन केले गेले होते. जीएसटी कार्यालयात अधिकृत नोंदणी झालेल्या व्यापारी-उद्योजकांनी अद्याप ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलात जीएसटीचा उल्लेख केलेला नाही. अकोल्यातील सराफा दुकानदारांपैकी बोटांवर मोजण्याएवढ्या लोकांकडे सॉफ्टवेअर अपडेट आहे. अनेकांना बिलातील रकाने भरण्याची माहितीदेखील तज्ज्ञांना विचारावी लागत आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटीच्या नोंदीत काही बिले निघत असली, तरी ८० टक्के व्यापाऱ्यांनी अजूनही जीएसटीचे बिल ग्राहकांना दिलेले नाही. ज्या फर्मने जीएसटी क्रमांक घेतला असेल, त्यांना आता मॅन्युअर कच्चे बिल देता येणार नाही, असा कायदा आहे; मात्र सॉफ्टवेअर अपडेट नसल्याने अकोल्यात हा घोळ सुरू आहे.
जीएसटीच्या बिलांना वेळ लागू शकत असला, तरी यामध्ये ग्राहकाचे नुकसान होता कामा नये. नवीन धोरणांची अंमलबजावणी करावीच लागेल. जीएसटीचे फायलिंग करताना व्यापाऱ्यांना ही माहिती अपडेट करावी लागेल.
- सुरेश शेंडगे,
उपायुक्त जीएसटी अकोला.