बेसनाच्या नावाखाली फरसान पावडरची सर्रास विक्री
By admin | Published: April 15, 2017 12:54 AM2017-04-15T00:54:08+5:302017-04-15T00:54:08+5:30
अकोला एमआयडीसीत १५ उद्योग : अन्न आणि औषध विभागाची चुप्पी
संजय खांडेकर - अकोला
देशातील सर्वात स्वस्त कथित बेसन मिळण्याचे ठिकाण म्हणून अलीकडे अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. चणा डाळ ८०-९० रुपये किलो दराने विकली जात असताना, अकोल्यातील बेसन ५० रुपये किलोच्या दराने मिळतेच कसे, याचा शोध घेतला असता, बेसनाच्या नावाखाली अकोल्यातील काही उद्योजक फरसान पावडर म्हणून ओळखल्या जात असलेल्या पिठीची सर्रास विक्री करीत असल्याचे समोर आले. फरसान पावडर म्हणजे नेमके काय, याचा शोध घेतला असता, सडक्या व टाकाऊ कडधान्याची चुरी या पावडर निर्मितीसाठी वापरली जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली.
काही नामांकित ब्रॅन्डच्या बेसनाची किंमत बाजारपेठेत शंभर रुपये प्रति किलोच्या घरात असताना अकोल्यातील उद्योजकांनी मात्र केवळ ५० रुपये किलोच्या दराचे बेसन बाजारपेठेत आणले. स्वस्त दराचा नीचांक अकोल्याने गाठल्याने राज्यातच नव्हे, तर दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातसह देशभरातील कानाकोपऱ्यात अकोल्याचे बेसन उत्पादक पोहोचले आहे. अकोल्यातील बेसनाची मागणी सातत्याने वाढल्याने कधीकाळी केवळ दोन-चार बेसन उत्पादक उद्योग असलेल्या अकोला औद्योगिक वसाहतीत आज जवळपास १५ बेसन उत्पादक उद्योग सुरू आहे.
चना डाळ आणि इतर कडधान्यांचे दर वधारलेले असताना, अकोल्यातील बेसन स्वस्त मिळतेच कसे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असला तरी याचा मागोवा कोणी घेतलेला नाही. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन विभागाने यासंदर्भात चुप्पी साधली आहे.
सडक्या कडधान्याची पावडर
हरभरा, वाटाणा, मटकी, तांदूळ, मका आणि लाख डाळीसह कडधान्याच्या सडक्या चुरीची पावडर करून त्याला हळद आणि इतर कृत्रिम रंग दिले जातात. त्यानंतर ही पावडर फरसान पावडर आणि बेसन म्हणून सर्रास बाजारात विकल्या जाते. हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात सुरू आहे.