प्रसूतीच्या मातांना कळा, डॉक्टरांना ‘रेफर’चा उमाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:04 PM2019-05-17T14:04:48+5:302019-05-17T14:07:33+5:30

प्रसूतीच्या कळांनी माता हैराण होण्याऐवजी डॉक्टरच आधी त्रस्त झाल्याने त्यांना रेफरचा उमाळा फुटतो, असा हा प्रकार असल्याची सध्या चर्चा आहे.

Most of PHC's in Akola district refer pregnat womens to District Hospital for delivery | प्रसूतीच्या मातांना कळा, डॉक्टरांना ‘रेफर’चा उमाळा!

प्रसूतीच्या मातांना कळा, डॉक्टरांना ‘रेफर’चा उमाळा!

Next

अकोला : ग्रामीण भागात गर्भवतींवर उपचार आणि प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर विशेष सुविधा करण्यात आली आहे; परंतु येथे जाणाऱ्या बहुतांश गर्भवतींना त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात रेफर केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसूतीच्या कळांनी माता हैराण होण्याऐवजी डॉक्टरच आधी त्रस्त झाल्याने त्यांना रेफरचा उमाळा फुटतो, असा हा प्रकार असल्याची सध्या चर्चा आहे.
गत वर्षभरात जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांत १७६६ गर्भवतींची प्रसूती झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यातील एक जिल्हा रुग्णालय, एक स्त्री रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, तर पाच ग्रामीण रुग्णालये आहेत. शिवाय, १७८ आरोग्य उपकेंद्र आणि ३० प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत प्रसूतीचा आढावा घेतला असता, ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांत केवळ १७६६ प्रसूती झाल्याचे समोर आले आहे, तर जिल्हा सत्री रुग्णालयात एकूण १३ हजार ७१८ प्रसूती झाल्या असून, त्यामध्ये तब्बल ६ हजार ३७३ गर्भवतींचे सीझेरियन झाले. या तुलनेत प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी प्रसूती झाल्याचे निदर्शनास येते. प्राथमिक आरोग्य केंद्रात सीझरची सुविधा उपलब्ध नसल्याने गर्भवतींना जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात येते; मात्र बहुतांश भागात पीएचसी सेंटरवर डॉक्टरच उपस्थित नसल्याने गर्भवतीला गंभीर म्हणून थेट जिल्हा स्त्री रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यामुळे जिल्हा स्तरावरील या दोन्ही रुग्णालयांत गर्भवतींची संख्या क्षमतेपेक्षा जास्त होत असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

१३७१८ प्रसूती झाल्या जिल्हा स्त्री रुग्णालयांतर्गत

६,३७३ गर्भवतींचे जिल्हा स्त्री रुग्णालयांतर्गत झाले ‘सीझेरियन’

सर्वोत्कृष्ट पाच पीएचसी
- जिल्ह्यातील वाडेगाव, महान, हिवरखेड आणि आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ठरत आहेत.
पीएचसी - एकूण प्रसूती
वाडेगाव - १६५
महान - १५४
हिवरखेड - १३७
आलेगाव - १२३

शून्य प्रसूती असलेल्या ‘पीएचसी’
कावसा आणि स्वस्ती येथील दोन्ही ‘पीएचसी’मध्ये एकही प्रसूती झाली नाही.
या ठिकाणी प्रसूती केंद्रात आवश्यक सुविधाच उपलब्ध नाहीत.


सुविधा असूनही प्रसूती नाहीत!
पळसो आणि जामठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच सुविधा उपलब्ध आहेत; परंतु या ठिकाणी प्रसूतीची संख्या सर्वात कमी आहे. 
 पीएचसी       -   एकूण प्रसूती
  पळसो         -   ४
 जामठी          -  ६

‘एमओं’ना मुख्यालयी थांबण्याची ‘अ‍ॅलर्जी’ 
प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असणाºया वैद्यकीय अधिकाºयांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे; मात्र बहुतांश वैद्यकीय अधिकारी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी खासगी प्रॅक्टिस करतात. यातील काही वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच ‘पीएचसी’वर हजेरी लावतात. त्यामुळे गर्भवतींचे हाल होतात. त्यांना मुख्यालयी राहण्याची ‘अ‍ॅलर्जी’च असल्याचे दिसून येते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. 
‘डीएचओ’ अन् ‘सीएस’समोर आव्हान
आरोग्य विभागात अपुरे मनुष्यबळ आहे; मात्र आहे ते अधिकारी, कर्मचारी व्यवस्थित काम करीत नसल्याने यंत्रणा कोलमडत आहे. त्यांच्याकडून काम करून घेत सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याचे आवाहन डीएचओ डॉ. विजय जाधव आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्यासमोर आहे. 

वैद्यकीय अधिकाºयांना मुख्यालयी राहून दररोज रुग्णसेवा देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही पीएचसी सोडल्यास इतर पीएचसीवर सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. तरीदेखील कामचुकारपणा होत असेल, तर अशांवर कारवाई केली जाईल. 
- डॉ. विजय जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी.


ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. डॉक्टरांसोबतच इतर कर्मचाºयांना मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कामचुकार डॉक्टर व कर्मचाºयांबाबत तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

Web Title: Most of PHC's in Akola district refer pregnat womens to District Hospital for delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.