अकोला जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण महापालिका क्षेत्रात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:31 AM2021-07-24T10:31:54+5:302021-07-24T10:32:01+5:30

Corona Vaccination : ग्रामीण भागातील लसीकरणाची गती संथ असल्याचे दिसून येते.

Most vaccinations in Akola district in municipal area! | अकोला जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण महापालिका क्षेत्रात!

अकोला जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण महापालिका क्षेत्रात!

googlenewsNext

अकोला: १८ वर्षांवरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. मोहिमेंतर्गत मागील सात महिन्यांत महापालिका क्षेत्रात सर्वाधिक लसीकरण झाले असून, अजूनही ग्रामीण भागातील लसीकरणाची गती संथ असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८ टक्के लोकांनीच लस घेतल्याची माहिती आहे. ही टक्केवारी वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृतीची गरज आहे. मध्यंतरी लस घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर चांगलीच गर्दी दिसून आली. मागणीच्या तुलनेत उपलब्ध लसीचा पुरवठा होत नव्हता, त्यामुळे जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र अद्यापही ग्रामीण भागात लसीकरणाची गती संथ असल्याचे दिसून येते. आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण शहरी भागात विशेषत: महापालिका कार्यक्षेत्रात झाल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. लसीची उपलब्धता मर्यादित असल्यानेही ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेवर परिणाम होत असल्याची माहिती आहे.

 

तालुकानिहाय लसीकरण

तालुका - झालेले लसीकरण

             - शहरी - ग्रामीण

अकोला - १,९६,५६५ - ४४४६४

अकोट - २६,४९४ - ३५६१३

बाळापूर - ९०४० - २९६७६

बार्शीटाकळी - ९९४८ - २५७३०

मूर्तिजापूर - १८,९६२ - २९५०७

पातूर - ३४१९ - २८४३५

तेल्हारा - १८,५९२ - २८१९८

------------------------------

एकूण - २,८३,०१२ - २,२१,३१९

लसीकरणाविषयी जनजागृतीची गरज

जिल्ह्यात अनेक ठिकाणी लस उपलब्ध असूनही अनेक जण लसीकरणाबाबत उदासीन दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांमध्येही अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

अशा परिस्थितीत लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत निरंतर लसीकरण सुरू आहेत. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये संतुलन राखण्यासाठी उपलब्ध डोसनुसार नियोजन केले जाते. लसीकरण पूर्णत: सुरक्षित असून, नागरिकांनी कुठलीही शंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे.

- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला.

Web Title: Most vaccinations in Akola district in municipal area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.