आता जिल्हा स्त्री रुग्णालयातही 'मदर मिल्क बँक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:49 AM2020-01-01T10:49:55+5:302020-01-01T10:51:07+5:30
प्रस्तावित मिल्क बँक ही अडीच हजार स्वेअर फूट क्षेत्रामध्ये निर्मित केली जाणार असून, त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे.
- प्रवीण खेते
अकोला : नवजात बालकासाठी आईचं दूध हे अमृततुल्यच... पण अनेकांच्या नशिबी आईचं दूध नसतं, अशा प्रत्येक नवजात शिशूंना आईचं दूध मिळणे शक्य होणार आहे. २०२० मध्ये मिल्क बँकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिल्क बँक सुरू झाली असून, ती नवजात शिशूंसाठी संजीवनी ठरत आहे.
प्रसूतीनंतर अनेक मातांना दूध येत नाही, अशा नवजात शिशूंसह काही अनाथ शिशूंनाही आईच्या दुधाची गरज असते. ही गरज भागविण्यासाठी नव्या वर्षात जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘मिल्क बँक’ सुरू करण्यात येणार आहे. प्रस्तावित मिल्क बँक ही अडीच हजार स्वेअर फूट क्षेत्रामध्ये निर्मित केली जाणार असून, त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. मिल्क बँक सुरू झाल्यानंतर येथे आईचे दूध संकलित करून अनेक शिशूंना आईच्या दुधाचा गोडवा मिळणार आहे. ही मिल्क बँक सुरू झाल्यास आगामी काळात शेकडो नवजात शिशूंसाठी जीवनदायिनी ठरणार आहे.
हे होतील फायदे...
- पण स्तनदा मातांच्या सहकार्याने दररोज नवजात शिशूंना आईचे दूध मिळणे शक्य होईल.
- शून्य ते सहा महिने वयोगटातील अशा नवजात शिशूंचा अनेक आजारांपासून बचाव होईल.
- त्यांना अॅन्टीबायोटिक देण्याची गरज राहणार नाही.
- बालमृत्यू दरही कमी होण्यास मदत होईल.
गरज जनजागृतीची
अनेकांपर्यंत ही मिल्क बँक पोहोचली नसल्याने अनेक गरजू नवजात शिशूंना आईचे दूध मिळत नाही. स्तनदा मातांपर्यंत मिल्क बँक पोहोचलीच नसल्याने अनेकांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे मिल्क बँकेच्या जनजागृतीची गरज आहे. रक्तदानाप्रमाणेच स्तनदा मातांना दूध दानासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
नववर्षात ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’ही होईल सुरू!
- जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’ सुरू होणार आहे.
- यांतर्गत नवजात शिशूंच्या पालकांना मार्गदर्शन केले जाईल.
- येथे कार्यरत कर्मचाऱ्यांनाही नवजात शिशूंच्या आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले जाईल.
- कंगारूहेल्प केअर सेंटरमध्येही प्रशिक्षण राबविण्यात येईल.
जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रस्तावित मिल्क बँकेच्या निर्माण कार्याला नववर्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. मिल्क बँक सुरू झाल्यास अनेक बालकांना आईचं दूध मिळणार असून, बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.