भक्ताच्या हाकेला धावणारी माता..!
By admin | Published: September 26, 2014 01:50 AM2014-09-26T01:50:34+5:302014-09-26T01:50:34+5:30
कुरणखेड येथील चंडिकादेवीं.
मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर कुरणखेड नावाच्या खेड्यातील एका टेकडीवर आदीशक्ती चंडिका देवी (माता) पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्ह्यासह विदर्भात भक्ताच्या हाकेला धावणारी माता म्हणून भाविकांचे श्रद्घास्थान आहे. प्राचीन काळात कुरणखेड हे गाव कुंचनपूर ओळखले जायचे. या परिसरात कुंतनपूर राजा नरेश यांचे राज्य होते. आपल्या राज्यातील जंगलात फेरफटका मारत असताना घनदाट जंगलातील एका टेकडीजवळील जागा व कोणातरी या जागेची व्यवस्था व राखण करीत असल्याचे राजाच्या दृष्टिक्षे पात आले. उत्सुकतेपोटी राजाने दुसर्या दिवशी सकाळी त्या जागेवर जाण्याचे योजून त्या ठिकाणावर गेला असता या निर्मनुष्य जंगलात त्या जागेला एक सिंह आपल्या शेपटीने त्या परिसराची स्वच्छता करीत असल्याचे दिसले. तेव्हापासून या आदीशक्ती मातेचे नाव चंडिका माता पडल्याची आख्यायिका आहे. कुंचनपूर गाव मंदिराचा उल्लेख पांडव प्रताप गं्रथातील चंद्रहास्य राजाच्या कथेत आला असल्यामुळे हे मंदिर पुरातन काळातील असल्याची पुष्टी मिळते. सध्याही हा परिसर निसर्गरम्य असून, या चंडिका माता मंदिर परिसरातून काटेपूर्णा नावाची नदी उत्तर दिशेकडे धावते आणि वैशिष्ट्ये असे की, देवीचे मंदिरसुद्घा उत्तरमुखी आहे. काटेपूर्णा नदीने या परिसराला सुशोभित केले असून, ही हिरवळ भाविकांना, पर्यटकांना आकर्षित करते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने म्हणावे त्या प्रमाणात अजून लक्ष घातले नाही, ही शोकांतीका म्हणावी लागेल.