एक वर्षापासून बेपत्ता असलेल्या मातेची दोन मुलांसोबत मातृदिनीच भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:41+5:302021-05-10T04:18:41+5:30
सचीन राऊत अकोला : मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका गावातून मार्च २०२० मध्ये बेपत्ता झालेल्या दोन ...
सचीन राऊत
अकोला : मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका गावातून मार्च २०२० मध्ये बेपत्ता झालेल्या दोन मुलांच्या आईला शोधण्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला यश आले आहे. या दोन मुलांच्या आईला पुण्यातील चाकण परिसरातून शोधून तिची मातृदिनीच मुलांसोबत भेट घालून देण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या या पथकाने आई व मुलांना अनोखे गिफ्ट दिल्याची चर्चा पोलीस खात्यात होती.
मूर्तिजापूर तालुक्यातील एका गावातील दोन मुले असलेली महिला एक वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. या प्रकरणाची तक्रार महिलेच्या पतीने मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद घेत महिलेचा शोध सुरू केला; मात्र शोध लागत नव्हता. त्यामुळे हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे वर्ग करण्यात आले. या कक्षाने महिलेचा शोध सुरू केल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीवरून ही महिला पुण्यातील चाकण परिसरात असल्याचे कळले. यावरून या कक्षाने तातडीने पुणे गाठून चाकण परिसरात शोध मोहीम राबवली असता महिलेचा शोध लागला. तिला दोन्ही मुलासंदर्भात माहिती दिल्यानंतर तिने पोलिसांसोबत मूर्तिजापूर येथे येण्यास होकार दिला. त्यानंतर मातृदिनीच या महिलेला मूर्तिजापूर येथे आणून तिची दोन मुलांसोबत भेट घडविण्यात आली. त्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे प्रमुख संजीव राऊत, सहायक पोलीस निरीक्षक प्रीती ताठे, सहायक पोलीस निरीक्षक महेश गावंडे, सुलभा ढोले, विजय खर्चे, सुरज मंगरूळकर, संजीव कोल्हटकर, पूनम बचे यांनी या महिलेला परत आणून तिची दोन मुलांसोबत भेट घालून दिली.
आतापर्यंत दहा महिला मुलींची त्यांच्या कुटुंबीयांसोबत भेट
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची स्थापना करण्यात आली. हा कक्ष बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देतो. या कक्षाने आतापर्यंत दहा महिला मुलींची त्यांच्या कुटुंबीयांसोबत भेट घालून दिली. तसेच त्यांचे संसार सुरळीत करून दिले. यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या कक्षाची कामगिरी भरीव असल्याचे दिसून येत आहे.