नात्याला काळीमा! चुलत बहिणीवर अत्याचार करून मातृत्व लादले
By नितिन गव्हाळे | Published: August 3, 2023 05:07 PM2023-08-03T17:07:47+5:302023-08-03T17:08:26+5:30
सिव्हिल लाईन्स ठाण्यातर्गंत येणाऱ्या भागात चुलत बहिण घरात एकटी असताना, तिच्यावर चुलतभावाने एकदा नव्हेतर अनेकदा बळजबरीने अत्याचार केला.
अकोला: समाजातील नितीमुल्ये, नैतिकतेचा ऱ्हास होत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. नात्यांनाही काळीमा फासण्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना शहरात घडली. अल्पवयीन चुलत बहिणीवर सातत्याने लैंगिक अत्याचार मातृत्व लादणाऱ्या नराधम युवकास अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालय, (विशेष न्यायालय) एस. जे. शर्मा यांनी गुरूवारी १० वर्ष सक्तमजुरी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सिव्हिल लाईन्स ठाण्यातर्गंत येणाऱ्या भागात चुलत बहिण घरात एकटी असताना, तिच्यावर चुलतभावाने एकदा नव्हेतर अनेकदा बळजबरीने अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितली तरी तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलीला जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे भरती केले असता, तेथे तिची प्रसूती झाली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी मुलीची चौकशी केल्यानंतर गुन्हा घडल्याची बाब उघडकीस आली. १० फेब्रुवारी २०१५ रोजी चौकशी दरम्यान पीडितेच्या घेतलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल आला.
पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण ७ साक्षीदार तपासले. न्यायालयाने साक्षी व पुरावे ग्राह्य मानुन भादंवि कलम २३५, ३७६(२)(फ) नुसार १० वर्ष सक्तमजुरीचा कारावास, ५ हजार रूपये दंड, न भरल्यास, एक वर्ष साधा कारावास तर कलम ५०६ मध्ये १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ५ हजार रूपये दंड, न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगवयच्या आहेत. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास तत्कालीन पीएसआय संजय रामहीत मिश्रा यांनी केला होता. पोस्टे पैरवी म्हणून हेडकॉन्स्टेबल गावंडे, प्रिया गजानन शेगोकार यांनी सहकार्य केले.
या आरोपातून आरोपी निर्दोष
या प्रकरणात घटनेच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती याचा समाधानकारक पुरावा उपलब्ध न झाल्याने पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमामधून आरोपीस न्यायालयाने निर्दोष असल्याचा निर्णय दिला.