‘मदर्स डे’ विशेष: आईच्या मार्गदर्शनात मुलीने गाजविले क्रीडा क्षेत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:49 PM2019-05-12T12:49:58+5:302019-05-12T12:50:11+5:30
आई जयश्री कालिदास सोनार यांच्या पावलावर पाऊल टाकून दीपिका सोनार आपले नाव क्रीडा क्षेत्रासोबतच कलाक्षेत्रातही गाजवित आहे.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: आई म्हणजे मुलीचं सर्वस्व असते. आईसारखे दिसावे, तिच्यासारखे राहावे, असे लहानपणी मुलींना सतत वाटत राहते. मग आईचे आचार आणि विचारांचे अनुकरण मुलीकडून होत राहते. असेच आई जयश्री कालिदास सोनार यांच्या पावलावर पाऊल टाकून दीपिका सोनार आपले नाव क्रीडा क्षेत्रासोबतच कलाक्षेत्रातही गाजवित आहे.
अकोल्यात पूर्वी चांगल्या घरातील मुलींनी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला तरी समाज नावे ठेवायचा. मुलगी छोटे कपडे घालूनच खेळते, अशा बोचऱ्या टिपण्या करू न हिणवत होते; मात्र जयश्री सोनार (पूर्वाश्रमीच्या जयश्री मधुकर शिंगणे) यांनी लोकांच्या बोलण्याक डे लक्ष न देता, बास्केटबॉल प्रशिक्षक पुरण गंगतीरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळ कारकिर्दीला सुरुवात केली. आई-वडिलांचीदेखील साथ मिळत असल्याने त्यांनी आपल्या भावंडांनादेखील क्रीडा क्षेत्राकडे वळविले. खेळ सुरू केला, त्याच वर्षी त्यांनी सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आपल्या संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. उस्मानाबाद, पुणे, चंद्रपूर, मुंबई व अमरावती येथील स्पर्धा गाजविल्या. पुणे आणि बिहार येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करू न क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या. बास्केटबॉल सोबतच हॅण्डबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धादेखील त्यांनी गाजविल्या. बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणूनही अनेक राज्ये व राष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी केली. अलिगड येथे झालेल्या राष्ट्रीय चॉकबॉल आणि पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय फ्लोरबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली.
जयश्रीतार्इंनी आपली मुलगी दीपिका हिलादेखील त्यांनी उत्तम खेळाडू म्हणून घडविले. दीपिकाने हॉकी खेळात अकोल्याचे नाव उज्ज्वल केले. हॉकीचे प्रशिक्षणदेखील दीपिकाला आपल्या आईकडूनच मिळाले. सातारा, अहमदनगर, मुंबई, सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत दीपिकाने अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर दीपिकाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हॉकी संघात स्थान निश्चित केले. तब्बल एका तपानंतर अकोल्यातून विद्यापीठ हॉकी संघात निवड होणारी एकमेव महिला खेळाडू होती. राजस्थान आणि ओडिसा येथे झालेल्या अ.भा. आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत दीपिकाने अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. यावर्षी दीपिकाच्या प्रशिक्षणात हरियाणा येथे झालेल्या १४ वर्षांआतील राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. राष्ट्रीय चॉकबॉल, फ्लोरबॉल, मुईथाई या खेळातही दीपिकाने चमकदार कामगिरी केली.
आई-वडिलांच्या प्रेरणेमुळेच मी खेळायला सुरुवात केली. आता पतीचीही साथ लाभते. प्रत्येक आईने लोक काय म्हणतील, याकडे लक्ष न देता आपल्या मुलींना त्यांचे विश्व निवडण्यासाठी साथ द्यावी.
जयश्री सोनार, राष्ट्रीय बास्केटबॉलपटू
- कोणत्याही समस्या आल्या किंवा मानसिकदृष्ट्या तणाव आला, तरी आईच्या सल्ल्यानेच त्रास कमी होतो. त्यावर मात करायला आणखी ऊर्जा मिळते.
दीपिका सोनार, राष्ट्रीय हॉकीपटू