मातांनाे, सुदृढ आराेग्यासाठी उत्तम आहार घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:41+5:302021-09-13T04:18:41+5:30
अकोला : नवजात शिशूंसह मातांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे, यासाठी ‘पोषण महा’अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात मातांना योगा अभ्यासासोबतच ...
अकोला : नवजात शिशूंसह मातांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे, यासाठी ‘पोषण महा’अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात मातांना योगा अभ्यासासोबतच पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत मातांना घरीच परस बाग फुलवून पोषण आहार उत्पादनाचेही मार्गदर्शन केले जात आहे. मातांच्या आरोग्यावरच नवजात शिशूंचे सुदृढ अन् निरोगी आरोग्य टिकून असते. त्यामुळे मातांनी काय खावे, स्वत:च्या आरोग्याविषयी काय काळजी घ्यावी, हे प्रत्येक मातेस माहिती असणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने जिल्हा स्त्री रुग्णालयात १ सप्टेंबरपासून प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह आणि पोषण माहास सुरुवात करण्यात आली. ‘कुपोषण छोड पोषण की ओर, थामे क्षेत्रीय भोजन की डोर...’ या घोष वाक्यानुसार जिल्हा स्त्री रुग्णालयात मातांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले जात आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच अधिपरिचारिका प्रत्येक वॉर्डात जाऊन मातांना पोषण आहाराविषयी मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमास मातांसह गर्भवतींकडूनही प्रतिसाद मिळत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरीही फुलतेय परस बाग
पोषण महाच्या निमित्ताने गर्भवतींसह मातांना पोषण आहाराचे मार्गदर्शन केले जात आहे. तसेच परस बागेच्या निमित्ताने प्रत्येकाने घरीच पोषण आहाराचे उत्पादन कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. हा उपक्रम सुरू असतानाच जिल्हा स्त्री रुग्णालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी आपल्या घरीच परस बाग फुलविण्यास सुरुवात केली आहे.
पोषण आहारात भाकरी, शेवग्याचे महत्त्व
मातांना पोषण आहारातून कॅल्शियम, आयर्न मिळणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने मातांसाठी भाकरी, शेवगा, गूळ या पदार्थांचे आहारातील महत्त्व मातांना पटवून दिले जात आहे. विशेष म्हणजे शेवगा ही बहुउपयोगी असून त्यातून मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न मिळत असल्याने याविषयी आवर्जून मार्गदर्शन केले जाते.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील परस बागेत या वनस्पती
अडुळसा, गुडवेल, लिंबू, आवडा, कोरफड, यासह मेथी, पालक, भोपळा, तुळशी, आले लावण्यात आले आहेत.
जिल्हा स्त्री रुग्णालयात १ सप्टेंबरपासून ‘पोषण महा’अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये गर्भसंस्कारासोबतच मातांच्या पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले जात आहे. तसेच घरीच परस बाग फुलवून पोषण आहाराचे उत्पादन कसे घ्यावे, याविषयी देखील मार्गदर्शन केले जात आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला