मोटारसायकल नदीत कोसळली; एक ठार
By admin | Published: March 19, 2017 02:46 AM2017-03-19T02:46:12+5:302017-03-19T02:46:12+5:30
मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एक जण ठार, तर दुसरा जखमी.
मूर्तिजापूर, दि. १८- समोरुन येणार्या वाहनाच्या दिव्यांच्या प्रकाशझोतामुळे डोळे दिपूून मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने १७ मार्च रोजी रात्री ७.३0 वाजता झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दुसरा जखमी झाला. हा अपघात येथून सात किमी अंतरावरील खरबडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर झाला; मात्र त्याची माहिती १८ मार्च रोजी पहाटे साडेसहाला मिळाली.
तालुक्यातील मंदुरा येथील ईश्वरदास रामचंद्र तेलमोरे (४५) व गजानन दादाराव तेलमोरे (३३) हे दोघे येथून बाजारामधून जीवनावश्यक वस्तू घेऊन काल संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान एम.एच. ३0 ए.एक्स १४२८ क्रमांकाच्या होण्डा डिलक्स मोटारसायकलवरून मंदुरा येथे जाण्यास निघाले. खरबडीजवळील कमळगंगा नदीचा पूल पार करीत असताना समोरून येणार्या अज्ञात वाहनाच्या दिव्यांच्या प्रकाशझोतामुळे डोळे दिपून चालक ईश्वरदासचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले व नदीच्या तुटलेल्या लोखंडी कठड्यामुळे मोटारसायकलसह दोघेही नदीपात्रात पडले. कोरड्या नदीपात्रात दगडावर डोके आपटून ईश्वरदासचा जागीच मृत्यू झाला. बेशुद्धावस्थेत असलेला गजानन तेलमोरे १८ मार्च रोजी पहाटे शुद्धीवर आल्यानंतर त्याने राजू मोरे नावाच्या त्याच्या नातेवाइकास या अपघाताची माहिती दिली. राजू मोरेने याबाबत मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. ईश्वरदासचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. जखमी अवस्थेतील गजाननवर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणेदार नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनात हेड काँस्टेबल कैलास कळमकर व काँस्टेबल महेश पिंजरकर पुढील तपास करीत आहेत.