माउंट कारमेलचे प्राचार्य ‘हाजीर हो’; बालहक्क न्याय समितीचा आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:43 AM2018-01-14T01:43:08+5:302018-01-14T01:48:13+5:30
अकोला : अकोला-शहरातील प्रसिद्ध माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्राचार्याला चांगलेच महागात पडले आहे. पालकांनी यासंदर्भात बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केल्यानंतर या समितीने माउंट कारमेलच्या प्राचार्याला १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सचिन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला-शहरातील प्रसिद्ध माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्राचार्याला चांगलेच महागात पडले आहे. पालकांनी यासंदर्भात बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केल्यानंतर या समितीने माउंट कारमेलच्या प्राचार्याला १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
राम नगरातील रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्याचा मुलगा माउंट कारमेल शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट आढळले, यावरून प्रचंड वादंग झाल्यानंतर प्राचार्याने विद्यार्थ्यास नोटीस देऊन शाळेतून कमी करण्याचे नमूद केले; मात्र हा प्रकार मुलाच्या वडिलांना खटकल्याने त्यांनी बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केली. त्यावर चौकशी झाल्यानंतर
समितीने प्राचार्याला बालहक्क न्याय समितीसमोर १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रामदासपेठ पोलीसही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी
विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट आढळल्यानंतर प्राचार्याने त्याच्या कुटुंबीयांना लेखी नोटीस दिली. या नोटीसनंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता प्राचार्य यांना सोबत घेऊन विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी केली; मात्र त्यामध्ये विद्यार्थी निर्व्यसनी असल्याचे स्पष्ट झाले.
विद्यार्थ्याने त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात एकदाही सिगारेट ओढली नसल्याचे समोर आल्याने हे पाकीट त्याच्या दप्तरात ठेवणार्याचा शोध घेण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
नोटीसमधील उल्लेख
प्राचार्याने या विद्यार्थ्याच्या घरी एक नोटीस पाठविली. या नोटीसमध्ये विद्यार्थ्यास शाळेतून कमी करण्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. मुलगा सिगारेट ओढत असल्याचे सांगत त्याच्यावर ताशेरे ओढले, त्यामुळे त्याचे वडील संतापले; मात्र त्यांनी या प्रकरणात घाई न करता मुलाला धीर देत प्रकरणाच्या खोलात गेले. मुलगा निर्व्यसनी असल्याचे समोर आले. पित्याने मुलावर राग काढला असता, तर प्रकरण वेगळय़ाच दिशेने गेले असते, हे निश्चित.
सदर विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळलेले सिगारेटचे पाकीट हे सौदी अरेबियातील असल्याचे समोर आले आहे. ते त्याच्या दप्तरात कसे काय आले, हा मोठा प्रश्न असून, सदर प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.