हिरवाईने नटल्या अजिंठ्याच्या पर्वतरांगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:18+5:302021-08-01T04:18:18+5:30
संतोषकुमार गवई पातूर : अकोला, वाशीम जिल्ह्याच्या सीमेवरील अजिंठ्याच्या पर्वतरांगांच्या पातूर-माळराजुरा वनपरिक्षेत्रातील हिरवाईने नटलेला निसर्ग पर्यटनासाठी पर्यटकांना खुणावतो आहे. ...
संतोषकुमार गवई
पातूर : अकोला, वाशीम जिल्ह्याच्या सीमेवरील अजिंठ्याच्या पर्वतरांगांच्या पातूर-माळराजुरा वनपरिक्षेत्रातील हिरवाईने नटलेला निसर्ग पर्यटनासाठी पर्यटकांना खुणावतो आहे. अकोल्यापासून ३५ किलोमीटर आणि वाशिमपासून ४५ कि.मी. अंतरावर अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर पातूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर माळराजुरा निसर्ग पर्यटन केंद्र आहे. पर्यटन केंद्र शनिवारपासून वन पर्यटनासाठी प्रादेशिक उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी खुला केल्याची माहिती दिली.
निसर्गाच्या हिरवाईने बहरलेल्या अजिंठ्याच्या पर्वतरांगा अतिशय विलोभनीय आहेत. दोन्ही डोंगरांच्यामधून राष्ट्रीय मार्ग जातो. पातूर घाटातून जाताना माळराजुरा पर्यटन केंद्र आहे. या पर्यटन केंद्रात विविध प्रकारच्या पक्षी, प्राण्यांचे दर्शन होते. त्याबरोबरच दुर्मिळ प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती जंगलात बघावयास मिळतात. पर्यटन केंद्राचे प्रवेशद्वार एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे बनवण्यात आलेले आहे. पर्यटन केंद्रामध्ये ‘चिल्ड्रेन पार्क’ही उभारण्यात आलेला आहे. पर्यटन केंद्रात जाण्यासाठी दुसऱ्या बाजूस सुवर्ण नदीतून पायी जाता येते. त्यानंतर पातूर तलाव, जंगलातील उंच उंच वृक्ष सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्याबरोबरच पर्यटन केंद्रातील मनोऱ्यावरून जंगलाचे विलोभनीय दृश्य बघावयास मिळते.
------------------------
कोरोनानंतर प्रथमच पर्यटकांसाठी खुले!
दरवर्षी अकोल्यास वाशिम जिल्ह्यातील पर्यटक पातूर पर्यटन केंद्राला भेटी देतात. मात्र गत दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पर्यटन केंद्र बंद होते. कोरोनानंतर प्रथमच पर्यटन केंद्र खुले झाले आहे.
--------------------------
पातूरला ऐतिहासिक वारसा
निसर्गासोबत पातूर शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. चौथ्या व सातव्या शतकातील वाकाटक राजाच्या कार्यकाळातील बुद्धकालीन गुफा, प्राचीन नानासाहेबांचे मंदिर, रेणुका माता मंदिर, दर्गा आदी धार्मिक व ऐतिहासिक परिसर पर्यटकांना पहावयास मिळणार आहेत. तसेच चिंचखेड येथील अंबादेवीचे मंदिर वनराजीमध्ये वसलेले आहे.
-------------------------
निसर्ग पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून पर्यटकांनी आनंद घ्यावा. सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करावे.
-धीरज मदने, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, पातूर.
-----------------
माळराजुरा पर्यटन केंद्र कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षित असे स्थळ समजले जाते. त्यामुळे नागरिकांनी लाभ घ्यावा.
प्रणाली धर्माचे, राऊंड आफिसर, माळराजुरा पर्यटन केंद्र, पातूर.
310721\img_20210716_171848.jpg
पर्यटकांसाठी खुले