शांततामय मार्गाने आंदोलन करा!
By admin | Published: June 7, 2017 01:11 AM2017-06-07T01:11:45+5:302017-06-07T01:11:45+5:30
शेतकरी बचाव आंदोलनाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमुक्तीसह स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाचे भाव मिळावेत, शेती लागवडीस सरकारने तगाई द्यावी, वीज बिल माफ करावे, आठ पदरी समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात येऊ नये, तसेच संपूर्ण दारूबंदी करावी, आदी महत्त्वपूर्ण मागण्यांकरिता शेतकरी बचाओ आंदोलनाने महाराष्ट्रातील क्रांती मोर्चास पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकरी बचाओ आंदोलनाचे विदर्भातील कार्यकर्ते सक्रिय आंदोलनात सहभागी झलो होते. सरकार जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती व अन्य मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचा हा लढा सुरू राहील. शेतकरी स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांना मागण्यांची निवेदने द्यावीत.
तहसील, गाव परिसरात शांततामय साखळी धरणे, उपोषण, बंद, मिरवणुका काढून आंदोलन करावे. हिंसाचारी आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन शेतकरी बचाओ आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत, संघटक अॅड. ग्यानेंद्रकुमार कुशवाह यवतमाळ, गजानन मांडवडे, नेताजी अरुण जाधव बुलडाणा, अनिल ठाकरे अमरावती, नंदु लोखंडे,पुरुषोत्तम पोटे अकोट, पुरुषोत्तम मनवर, मंगला देशमुख कारंजा, रत्ना खंडारे, अतुल थोरात आदी विदर्भातील शेतकरी स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले, तसेच ५ जूनचे शेतकरी मागण्यांकरिता होऊ घातलेल्या बंदमध्ये शांततामय पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी संपाला जिल्ह्यात प्रतिसाद
सध्या राज्यभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला अकोला जिल्ह्यात अकोट,मुर्तिजापूरसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे. या संपाला विविध संघटना आपला पाठिंबा व्यक्त करीत आहे.