ट्रांसजेंडर विधेयकाविरुद्ध किन्नरांचे २० जानेवारी रोजी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:19 PM2019-01-15T12:19:52+5:302019-01-15T12:20:00+5:30
अकोला : लोकसभेत ट्रांसजेंडर विधेयक पास करण्यात आले असून, या विरोधात देशभरातील किन्नर समाजाने लढा देण्याची तयारी केली आहे.
अकोला : लोकसभेत ट्रांसजेंडर विधेयक पास करण्यात आले असून, या विरोधात देशभरातील किन्नर समाजाने लढा देण्याची तयारी केली आहे. आपल्या मौलिक अधिकाराच्या बचावासाठी देशभरातील किन्नर समाज दिल्ली स्थित जंतर-मंतर मैदानावर २० जानेवारी रोजी आंदोलन करणार आहे. यासाठी जिल्ह्यातून २०० पेक्षा जास्त किन्नर सहभागी होणार असल्याची माहिती जन सत्याग्रह संगठन किन्नर सेलच्या अध्यक्ष गुरु सिमरन नायक अम्माजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंदोलनाच्या रुपरेषेसंदर्भात सोमवार, १४ जानेवारी रोजी संगठनतर्फे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी लोकसभेत मांडण्यात आलेल्या ट्रांसजेंडर विधेयकाला आमचा विरोध नाही; पण या विधेयकामुळे इतिहासापासून सुरू असलेली गुरु-चेला ही परंपरा नष्ट होण्याचा धोका आहे. शिवाय, विविध उत्सवाच्या काळात आशीर्वाद देताना स्वीकारण्यात येणारे दान हे भीक म्हणून दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने या दोन मुद्याला किन्नरांचा विरोध आहे. गुरू-चेला ही परंपरा कायम राहावी, यासाठी आमचा लढा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. किन्नर हे सर्वच जाती, धर्मात जन्माला येतात. त्यामुळे त्यांच्या जातीचा प्रवर्गदेखील वेगवेगळा आहे; परंतु त्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रकारदेखील चुकीचा आहे. त्यामुळेच ट्रांसजेंडर विधेयक थांबविण्यात यावे, राज्यसभेमध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात येऊ नये, त्यामध्ये सुधारणा करून किन्नरांना रोजगार, संस्कृती जतन करण्याचा अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये, आदी मागण्यांसाठी २० जानेवारी रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर किन्नर समाज आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला गुरु सिमरन नायक अम्माजी यांच्यासह मुस्कान गुरू सिमरन अम्माजी, मोगरा गुरू सिमरन अम्माजी, मुस्कान गुरु सिमरन अम्माजी, प्रिया गुरू सिमरन अम्माजी, ईश्वरी गुरू सिमरन अम्माजी, सना गुरू सिमरन अम्माजी, मेघा गुरू आलीया, रारिका गुरू मुस्कान, चांदनी गुरू सना यांची उपस्थिती होती.