शेतक-यांसाठी आंदोलने उभारा!

By admin | Published: May 7, 2017 02:47 AM2017-05-07T02:47:31+5:302017-05-07T02:47:31+5:30

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जिल्हाप्रमुखांना आदेश.

Movement for farmers! | शेतक-यांसाठी आंदोलने उभारा!

शेतक-यांसाठी आंदोलने उभारा!

Next

अकोला: भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांवर संकट ओढवले आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी बाळापूर तालुक्यात काढण्यात आलेला ह्यरुमणेह्ण मोर्चा सीमित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यात शेतकर्‍यांसाठी आंदोलने उभारण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिला. अकोला जिल्ह्यातील रुमणे मोर्चा यानंतर राज्यभरात आयोजित केला जाण्याचे संकेत आहेत.
गतवर्षी निसर्गाने साथ दिल्याने सोयाबीन, तूर, कापसाचे भरघोस उत्पादन झाले. सोयाबीनची आवक वाढताच भावात जाणीवपूर्वक घसरण करण्यात आली. हाच प्रकार तुरीच्या बाबतीत घडला. तुरीचे भाव पाडून नाफेडमार्फत शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तूर खरेदीची पद्धत, उपलब्ध बारदाणा, एकाच दिवशी अवघ्या काही क्विंटल तुरीचे होणारे मोजमाप आदी प्रकार पाहता तूर खरेदीवरून भाजपने शेतकर्‍यांची चेष्टा केल्याचा आरोप करत जिल्हा शिवसेनेने बंद पडलेली तूर खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन छेडल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ५ मे रोजी बाळापूर तालुक्यात ह्यरुमणेह्णमोर्चा काढला. मोर्चात सहभागी शेतकर्‍यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल घेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचे जोपर्यंत निराकरण होत नाही, कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाभरात तीव्र आंदोलने उभारण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

जिल्हाप्रमुखांनी घेतली बैठक
पक्ष प्रमुखांच्या सूचनेमुळे शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी सक्रिय झाल्याचे दिसून आले. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शनिवारी उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. बैठकीला उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, दिलीप बोचे, तालुका प्रमुख विजय मोहोड, अप्पू तिडके, गजानन मानतकार, संजय शेळके, श्याम गावंडे आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्याचे पक्षप्रमुखांनी आदेश दिले आहेत. संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया तसेच स्थानिक पदाधिकार्‍यांसोबत चर्चा विनिमय करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.
-नितीन देशमुख,
जिल्हाप्रमुख शिवसेना

Web Title: Movement for farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.